न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ जून २०१९) :- लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने आता आपला मोर्चा विधानसभेकडे वळवला आहे. याअंतर्गत राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि देशाचे माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या विभागवार बैठका घेण्यास सुरुवात केली आहे.
आज गुरुवार (दि. ६) रोजी त्यांनी भोसरीत पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. आपल्या पराभवाचे आत्मचिंतन करणे गरजेचे असल्याचे सांगताना शरद पवार यांनी अमोल कोल्हे यांच्या शिरुरमधील विजयाबद्दल पदाधिकाऱ्यांचे आभारही मानले.
“आरएसएसचे सदस्य कसा प्रचार करतात, हे लक्षात घ्या. पाच घरांमध्ये भेटायला गेले, अन् एक घर बंद असेल तर ते संध्याकाळी जातात. संध्याकाळी बंद असेल तर सकाळी जातो, पण त्या घरी जाऊनच येतो. संपर्कात कसं राहावं हे आरएसएस पासून शिकावं, असं मला एका खासदाराने सांगितले.”, असे शरद पवार यांनी भोसरीत राष्ट्रवादीच्या पदाधिकऱ्यांशी संवाद साधताना सांगितले.
आतापासूनच घरोघरी जाऊन भेटायला हवं. असं भेटलात, तर ऐनवेळी आठवण काढली का? असा प्रश्न विधानसभेवेळी मतदार उपस्थित करणार नाहीत, असाही सल्ला पवारांनी पदाधिकाऱ्यांना दिला.
विधानसभा निवडणुकीबाबत बोलताना शरद पवार म्हणाले, “मी कुठलाही उमेदवार जाहीर करणार नाही. पण नवीन चेहरे शोधा आणि तरुण उमेदवार शोधा,” असेही कार्यकर्त्यांना उद्देशून पवार म्हणाले.
यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर, माजी आमदार विलास लांडे, अण्णा बनसोडे, महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने, भाऊसाहेब भोईर, नाना लोंढे, अजित गव्हाणे, अरुण बोऱ्हाडे, यांच्यासह आजी-माजी नगरसेवक उपस्थित होते.














