- बांगलादेशी घुसखोरांना आश्रय देणाऱ्या खालुंब्रे आणि महाळुंगेतील स्थानिकांवर कारवाई..
- उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २९ मार्च २०२६) :- उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत भाडेकरूंची माहिती पोलीसांना न देता बेकायदेशीररित्या परदेशी नागरिकांना आश्रय दिल्याप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी दहशतवाद विरोधी शाखेतील पोलीस शिपाई पुंडलिक नरसिंग पाटील यांनी फिर्याद दिली आहे. पहिल्या घटनेत आरोपी श्रीकांत बोत्रे (वय ३६, रा. खालुंब्रे, ता. खेड) याने पोलीस आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार भाडेकरूची माहिती सादर करण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ केली. तपासादरम्यान त्याच्या घरात मेखैरुल इस्लाम (वय ३७) हा बांगलादेशी नागरिक बेकायदेशीररित्या वास्तव्यास असल्याचे आढळून आले.
दुसऱ्या प्रकरणात महाळुंगे इंगळे येथील एका महिला आरोपीनेही भाडेकराराची माहिती पोलीसांना दिली नाही. तिच्या घरात इद्रीस गाझी (वय २८) हा बांगलादेशी घुसखोर राहत असल्याचे उघड झाले.
दोन्ही घटनांमध्ये संबंधितांनी पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड यांच्या वैध आदेशाचा भंग केला असून, कोणताही अधिकृत भाडेकरार न करता परदेशी नागरिकांना आश्रय दिल्याचे निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणांचा पुढील तपास पोहवा पठारे व पोहवा कारोटे करीत असून, अशा प्रकारच्या नियमभंगाविरुद्ध पोलीसांकडून कडक कारवाई सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.








