- शेवटी जातीवाचक वक्तव्य भोवलं; अॅट्रॉसिटीनुसार गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १४ मे २०२६) :-जुनी सांगवी येथील ब्युटी पार्लरमध्ये एका महिलेला जातीवाचक वक्तव्य करून अपमानित केल्याप्रकरणी एका महिलेविरोधात सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार हा गुन्हा नोंदविण्यात आला असून आरोपी महिलेला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सोमवारी (दि. १२ मे) सायंकाळी पाच ते सव्वासहा वाजण्याच्या दरम्यान जुनी सांगवी येथील एका ब्युटी पार्लरमध्ये घडली. फिर्यादी महिला पार्लरचे शुल्क भरण्यासाठी काउंटरवर बसल्या असताना तेथे उपस्थित महिलांमध्ये नसरापूर येथील अल्पवयीन मुलीच्या घटनेवर चर्चा सुरू होती.
त्यावेळी आरोपी महिलेने “त्या जातीचे लोक तसेच करतात” असे वक्तव्य केले. फिर्यादी यांनी स्वतः नवबौद्ध समाजातील असल्याचे सांगितल्यानंतर आरोपीने “तुम्ही आरक्षणाचे खाता, भिकाऱ्यासारखे आरक्षण घेता” अशा शब्दांत जातीवाचक टिप्पणी करून अपमान केल्याचा आरोप फिर्यादींनी केला आहे.
या घटनेनंतर सांगवी पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपी महिलेला अटक केली आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.













