- आ. महेश लांडगे यांच्या पाठपुराव्यानंतर चार ठिकाणांचा प्रस्ताव महापालिकेकडे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २८ सप्टेंबर २०२६) :- भोसरी विधानसभा मतदारसंघातील मंडल अधिकारी आणि तलाठी कार्यालयांना हक्काची जागा उपलब्ध करून देण्याच्या प्रक्रियेला गती मिळाली आहे. आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्यानंतर अपर तहसीलदार कार्यालयाने चार ठिकाणच्या जागांचा प्रस्ताव पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे पाठवला आहे.
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली १५ सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत आमदार लांडगे यांनी महसूल कार्यालयांसाठी जागांची आवश्यकता मांडली होती. त्यानुसार बोऱ्हाडेवाडी, डुडुळगाव, वडमुखवाडी आणि दापोडी येथील महापालिकेच्या इमारतींमधील उपलब्ध जागांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
या कार्यालयांना कायमस्वरूपी जागा मिळाल्यास सातबारा, फेरफार, जमीन अभिलेख आणि महसूलविषयक कामांसाठी नागरिकांना स्थानिक पातळीवर सुविधा उपलब्ध होऊ शकतील. मात्र, जागा हस्तांतरणाची प्रक्रिया महापालिका स्तरावर पूर्ण होणे अद्याप बाकी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली या विषयाचा पाठपुरावा केल्याचे आमदार लांडगे यांनी सांगितले.
“महसूल विभागाशी संबंधित कामांसाठी नागरिकांना त्यांच्या परिसरातच सुलभ सुविधा मिळाव्यात, हा आमचा प्रयत्न आहे. कार्यालयांच्या जागांबाबतचा प्रस्ताव पुढे गेला आहे. आता महापालिका स्तरावरील कार्यवाही लवकर पूर्ण व्हावी, यासाठी पाठपुरावा सुरू ठेवू.”
– महेश लांडगे, आमदार, भाजपा…


















