न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ३० सप्टेंबर २०२६) :- धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या ‘स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण’ला ऐतिहासिक मानवंदना देण्यासाठी मोशी येथे पुन्हा एकदा हजारो ढोल-ताशांचा निनाद घुमणार आहे. रविवार, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी २ वाजता बोऱ्हाडेवाडी, मोशी येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्रात हा सोहळा होणार आहे. याबाबत माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी ढोल-ताशा महासंघाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष पराग ठाकूर, पुणे अध्यक्ष अक्षय बलकवडे, पिंपरी-चिंचवड अध्यक्ष विशाल मानकर, हिंदुभूषण स्मारक ट्रस्टचे उपाध्यक्ष गणेश महाराज भुजबळ आणि सदस्य प्रशांत वायकर उपस्थित होते.
हिंदुभूषण स्मारक ट्रस्ट आणि ढोल-ताशा महासंघ, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सोहळ्यासाठी पाच हजारांहून अधिक ढोलवादकांची नोंदणी पूर्ण झाली आहे. विविध ढोल-ताशा पथकांच्या सामूहिक वादनातून विश्वविक्रम नोंदविण्याचा आयोजकांचा संकल्प असून, अधिकृत पुष्टी कार्यक्रमानंतर होणार आहे. यासोबतच पिंपरी-चिंचवडमध्ये उभारण्यात येत असलेल्या १२८ मीटर उंच भगव्या ध्वजासही मानवंदना देण्यात येणार आहे. गतवर्षीच्या सोहळ्याला मिळालेल्या प्रतिसादानंतर यंदा मोठ्या संख्येने पथके सहभागी होणार आहेत. नागरिकांनी सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले.


















