- प्रतिभा जॉब फेअर २०२६ मध्ये ९२ कंपन्यांचा सहभाग…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ३० सप्टेंबर २०२६) :- केवळ पदवी मिळविणे पुरेसे नसून त्यासोबत आवश्यक पूरक कौशल्ये, प्रभावी संवाद, योग्य देहबोली, चांगली वर्तणूक आणि आत्मविश्वास आत्मसात करणे गरजेचे आहे. या गुणांच्या जोरावर नोकरी तसेच व्यवसाय क्षेत्रात यशस्वी होता येते, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. धनंजय मंडलिक यांनी व्यक्त केले.
कमला एज्युकेशन सोसायटी संचलित प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या सहकार्याने चिंचवड येथील प्रतिभा महाविद्यालयात आयोजित ‘प्रतिभा जॉब फेअर २०२६’चे उद्घाटन आमदार उमा खापरे आणि डॉ. धनंजय मंडलिक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व फुगे सोडून झाले. जळगाव, अमरावती, अहिल्यानगर, संभाजीनगर, मंचर, चाकण, सातारा, कोल्हापूर, पुणे, लोणावळा, तळेगाव, कल्याण तसेच पिंपरी-चिंचवड परिसरातील उमेदवारांनी सहभाग घेतला. यावेळी ९२ कंपन्यांनी सहभाग नोंदविला असून ४५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली, तर सुमारे ५००० उमेदवारांनी उपस्थिती दर्शविली. उमेदवारांनी मिळालेल्या संधीचा उपयोग करून मुलाखतीतील चुका समजून घेत पुढील संधींसाठी आत्मविश्वासाने तयारी करावी, असे डॉ. मंडलिक यांनी सांगितले.
आमदार उमा खापरे म्हणाल्या की, पदवीधर युवकांच्या हाताला काम आणि योग्य संधी मिळावी यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. नोकरी मिळणे महत्त्वाचे असले तरी कंपन्यांशी संपर्क होणे आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
अध्यक्षीय भाषणात प्रतिभा ग्रुपचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा म्हणाले की, प्रतिभा महाविद्यालयाचा हा अकरावा जॉब फेअर आहे. गेल्या दहा जॉब फेअरच्या माध्यमातून बी.कॉम., बी.एड., बी.बी.ए., बी.सी.ए., बी.एस्सी., एम.कॉम., एम.बी.ए., एम.सी.ए., एम.एस्सी., बी.ई., बी.टेक., एम.ई. आणि एम.टेक. आदी शैक्षणिक पात्रता असलेल्या पाच हजारांहून अधिक उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नोकरी किंवा व्यवसाय क्षेत्रात कोणतेही काम छोटे-मोठे नसते. अनुभव आणि कौशल्याच्या जोरावर भविष्यात स्वतःचा व्यवसाय उभारून इतरांना रोजगार देणारे व्यावसायिक व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर यांनी जॉब फेअरला भेट देऊन उमेदवारांना मार्गदर्शन केले. पुरेसे ज्ञान असण्याबरोबरच प्रभावी संवाद साधता आला पाहिजे, समूहात काम करताना ‘मी’पणा नसावा आणि समस्या सोडविण्याची क्षमता विकसित करावी, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या व्यासपीठावर संस्थेच्या खजिनदार डॉ. भूपाली शहा, संचालक डॉ. तेजल शहा, विश्वस्त शैलेश शहा, तळेगाव लायन्स क्लबच्या अध्यक्षा अमृता कुलकर्णी, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया, प्राचार्या डॉ. क्षितीजा गांधी, डॉ. वनिता कुऱ्हाडे, डॉ. पौर्णिमा कदम, एम.बी.ए.चे संचालक डॉ. सचिन बोरगावे, मुख्याध्यापिका डॉ. वृंदा जोशी-मुलतानी आदी उपस्थित होते.
यावेळी विविध कंपन्यांचे संचालक, उद्योग समूहातील मनुष्यबळ विभागाचे वरिष्ठ अधिकारी व विभाग अधिकारी तसेच महाविद्यालयातील डॉ. हर्षिता वाच्छाणी, डॉ. हनुमंता कोळी, डॉ. गुरुराज डांगरे, सायली आमले, अंशूम वर्मा, वहीदा पठाण आणि डॉ. मनीष पाटणकर यांचा डॉ. दीपक शहा, डॉ. भूपाली शहा व डॉ. तेजल शहा यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्या डॉ. वनिता कुऱ्हाडे यांनी केले, तर आभार प्राचार्या डॉ. क्षितीजा गांधी यांनी मानले. जॉब फेअर यशस्वी करण्यासाठी प्राचार्यांसह प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.


















