न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ३० सप्टेंबर २०२६) :- पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अनधिकृतपणे वास्तव्यास असलेल्या अफगाण नागरिकाचा शोध घेऊन दहशतवाद विरोधी शाखा (एटीबी) आणि परकीय नागरिक नोंदणी विभागाने (एफआरओ) संयुक्त कारवाई केली. DAYNAR HUSSAIN असे या अफगाण नागरिकाचे नाव असून तो विद्यार्थी असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.
पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या सूचनेनुसार एटीबीने परकीय नागरिकांचा शोध घेण्यासाठी एफआरओची मदत घेतली. मिळालेल्या माहितीनुसार DANYAR HUSSAIN हा बावधन परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर दहशतवाद विरोधी शाखा आणि एफआरओच्या पथकाने २८ सप्टेंबर रोजी बावधन पोलिसांच्या मदतीने सिद्धार्थनगर, बावधन येथे त्याचा शोध घेतला. चौकशीत संबंधित व्यक्तीचे वय २६ वर्षे असून तो अफगाणिस्तानचा नागरिक असल्याचे समोर आले. तो एम.ए. (इकॉनॉमिक्स) अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होता. मात्र जानेवारी २०२६ पासून महाविद्यालयात गैरहजर असल्याचे तपासात आढळले.
पोलिसांनी त्याचा पासपोर्ट व व्हिसाबाबत पडताळणी केली असता त्याची वैधता १२ जून २०२४ ते २६ जून २०२७ अशी आहे. विद्यार्थी व्हिसाची मुदतही २६ जून २०२७ पर्यंत असल्याचे आढळले. मात्र भारतात राहण्यासाठी आवश्यक असलेल्या रेसिडेन्शियल परमिटची मुदत ३१ ऑगस्ट २०२६ रोजी संपलेली असून त्यानंतर कोणतीही मुदतवाढ मिळालेली नसल्याने तो अनधिकृतपणे वास्तव्यास असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
या कारवाईसाठी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सहपोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त डॉ. बसवराज तेली, पोलीस उपायुक्त-विशेष शाखा धीरज पाटील, एफआरओचे पोलीस निरीक्षक विजय वाघमारे तसेच एटीबीचे पोलीस निरीक्षक विकास राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक देसाई आणि एटीबी पथकाने बावधन पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली.


















