न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ जून २०१९) :- तीर्थक्षेत्र आळंदी-देहु-पंढरपुर वारीकरिता जाणा-या पिंपरी-चिंचवड शहरातील मार्गावरील मेट्रो पोलवर वारकरी संप्रदायाची छायाचित्रे रेखाटण्यात यावी, अशी मागणी आमदार लक्ष्मण जगताप यांनी पिंपरी-चिंचवड पुणे मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक यांच्याकडे लेखी निवेदनांद्वारे केली आहे.
पुणे, पिंपरी-चिंचवड येथील तीर्थ क्षेत्र आळंदी-देहु येथून जगदगुरु श्री संत ज्ञानेश्वर माऊली आणि श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळयात दरवर्षी पाच लाखांहून अधिक वारकरी पंढरपूरपर्यंत पायी वारी करीत असतात. पालखी सोहळ्या दरम्यान महाराष्ट्रातून भाविकांची रेलचेल चालू असते.
या पायी वारीत आळंदी, देहु येथील महात्म्य जर भाविकांनी छायाचित्रांच्या माध्यमांतून कळण्यासाठी मेट्रो पोलवर वारकरी संप्रदायाबाबतची छायाचित्रे रेखाटावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. मेट्रो पोलवर संत साहित्याचे रेखाचित्रे रेखाटली तर, पिंपरी-चिंचवडच्या नावलौकिकात भर पडेल.
पंढरीच्या वारीचा हा अनुभव भक्तांना स्वर्गसुख देणारा असतो. पुरोगामी विचारांचा समाज घडविण्यासाठी संताचे विचार आणि छायाचित्रे वारीच्या मार्गावर मांडले गेले तर पुरोगामी समाज व राज्य घडविण्यास मदत होईल, असे त्यांनी या पत्रात म्हटले आहे.


















