न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ जून २०१९) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने आणि पिंपरी चिंचवड़ अमेच्युअर बॉडी बिल्डिंग असोसिएशन यांच्या सहकार्याने माजी महापौर डॉ. वैशाली घोडेकर(लोंढे) महापौर चषक ५९ वी ‘राष्ट्रीय शरिरसौष्ठव स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा शुक्रवारी (दि. २८) आणि शनिवारी (दि. २९) रोजी चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण सभागृहात होणार आहे, अशी माहिती महापौर राहुल जाधव यांनी दिली.
बुधवारी (दि. २६) रोजी महापौर कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी क्रीड़ा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीचे सभापती तुषार हिंगे, नगरसेवक राजू मिसाळ, सागर गवळी, क्रीडा सहायक आयुक्त आशा राऊत उपस्थित होत्या. २७ राज्यातून महिला व पुरूष असे एकूण ३०० शरिरसौष्ठव खेळाडू सहभागी होणार आहेत. विजेत्या खेळाडूंना १६ लाख ६५ हजार रूपयांची बक्षिसे, ट्रॉफी, मेडल्स देण्यात येणार आहे.
स्पर्धेसाठी इंडियन बाॅडी बिल्डिंग फिटनेस फेडरेशनचे सचिव संजय मोरे, महाराष्ट्र बाॅडी बिल्डिंग असोसिएशनचे सचिव राजेश सावंत यांचे सहकार्य लाभणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार असून महापौर राहुल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात येणार आहे. यावेळी खा. श्रीरंग बारणे, खा. अमर साबळे, खा. अमोल कोल्हे, खा. सुप्रिया सुळे, भाजप शहराध्यक्ष व आ. लक्ष्मण जगताप, आ. महेश लांडगे, आ. ऍड. गौतम चाबुकस्वार, स्थायी समिती अध्यक्ष विलास मडिगेरी, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, आयुक्त श्रावण हर्डीकर, क्रीडा कला साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती तुषार हिंगे आदी उपस्थित राहणार आहेत.











