न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ जुलै २०१९) :- पिंपरी चिंचवड शहरातील कचरा समस्या काही केल्या संपत नाही. मोठा गोजावाजा करून महापालिकेने घंटागाड्यांचा फीत कापून शुभारंभ केला. त्यामुळे शहरातील कचरा समस्या कायमची हद्दपार होणार असे सुरुवातीला वाटले. परंतु, शहरातील कचरा समस्या कायमच आहे. याबाबतीत ठेकेदारांची मनमर्जी सुरूच असून, ठेकेदारांच्या मनाप्रमाणे करूनही शहरातील कचरा समस्या संपणार नसल्यास नागरिकांनी आपला घरचा कचरा महापालिकेत आणून टाकायचा का? असा संतप्त सवाल नगरसेवक उपस्थित करू लागले आहेत.
याबाबत पिंपरी महापालिकेच्या सर्वपक्षीय नगरसेवकांनी आज बुधवार (दि. ३) रोजी आयुक्त दालनात महापालिका आयुक्त हर्डीकर यांना घेराव घातला. तसेच शहरात साचलेल्या कचऱ्याबाबत आयुक्तांनी जबाब देण्याची मागणी केली. ही समस्या कायमची संपवा. अन्यथा पुढील प्रसंगाना तयार राहा, असा निर्वाणीचा इशारा सर्वपक्षीय नगरसेवकांनी आयुक्तांना यावेळी दिला.
याप्रसंगी आयुक्तांनी दोन दिवसांत समस्यांचे निराकरण करणार असल्याचे तसेच तात्काळ संबधित ठेकेदाराला कारणे दाखवा नोटीस बजावून, दोन दिवसात शहरातील कचरा समस्या व्यवस्थित करणार असल्याचे आश्वासन दिले.
यावेळी शिवसेना गटनेते राहुल कलाटे, मनसे गटनेते सचिन चिखले, राष्ट्रवादीचे नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, राजु मिसाळ, शाम लांडे, भाजपचे नगरसेवक शञुघ्न काटे, नामदेव ढाके, माजी नगरसेवक तथा जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मारूती भापकर, शिवशाही व्यापारी संघ संस्थापक-अध्यक्ष युवराज दाखले, साहील शेख, सतिष भवाळ, मनोज लांडगे आदी उपस्थित होते.















