न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ जुलै २०१९) :- पुणे महापालिकेच्या हद्दीमध्ये सिमाभिंत पडून अनेक मजुरांना आपला जीव गमवावा लागला आहे. यासोबतच इतर शहरामध्येही अशा घटना घडल्या आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत अशा घटना घडू नयेत, यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन महापालिकेचे सह शहर अभियंता राजन पाटील यांनी केले आहे.
याबाबत पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी सह शहर अभियंता राजन पाटील, कार्यकारी अभियंता राजेंद्र राणे, शिरीष पोरेड्डी, उपअभियंता विजय भोजने आदी उपस्थित होते.
राजन पाटील म्हणाले की, धोकादायक इमारतीचा सर्वे केल्यानंतर त्यामध्ये एकूण ५७ इमारतींचा समावेश आहे. त्यामध्ये ३१ इमारत्यांची दुरुस्ती केली असून, ३ इमारती पाडण्यात आल्या आहेत. उर्वरीत २३ धोकादायक इमारतींना नोटीसा दिल्या असून, ही बांधकामे काढून घ्यावीत, अन्यथा दुरुस्ती करावेत अशा सूचना देण्यात आल्या आहेत. महापालिकेच्या ‘अ’ प्रभागात २२, ‘ब’ मध्ये १०, ‘क’ ३, ‘ड’ ४, ‘इ’ ३, ‘फ’ ३ आणि ‘ग’ प्रभागात १२ अशी ५७ बांधकामे धोकादायक आहेत. महापालिकेच्या बांधकाम परवानगी विभागामार्फत परवानगी दिलेल्या, अथवा बांधकाम सुरु असलेल्या, किवा बांधकाम पूर्ण झालेल्या प्रकल्पांची संबधिंत बीट निरीक्षकांनी पाहणी करावी. ज्या ठिकाणी सीमाभिंत, रिटेनिंग वॉल तसेच इमारतीचे बांधकाम धोकादायक आहे का? याची तपासणी करावी, बांधकाम धोकादायक असल्यास ९ जुलैपर्यंत अहवाल सादर करावा अशाही सुचना करण्यात आलेल्या आहेत.
सिमाभिंतीलगत किंवा नाल्याच्या बाजुस, झाडाच्याखाली कामगारांच्या वसाहती असल्यास त्या त्वरीत सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे सांगण्यात आले आहे. शहरात अनेक ठिकाणी कंपाऊंड वॉल, रिटेनिंग वॉल, वॉचमन केबीन, पाण्याची टाकी या कामांचा व्यवस्थित आराखडा केलेला नसतो. त्यामुळे ही बांधकामे पडून जिवित हानीच्या घटना घडतात. सीमाभिंत पडून जिवितहानी अशा घटना टाळण्यासाठी बांधकाम पूर्णत्वाचा किवा भाग पूर्णत्वाचा दाखला देताना इमारतीचे (स्ट्रक्चरल स्टॅबिलीटी सर्टीफिकेट) (संरचनात्मक स्थैयर्ता) यासोबतच प्रकल्पातील इतर सर्व प्रकारच्या आराखड्याचे सर्टीफिकेट घेणे बंधनकारक कऱण्यात यावेत. बांधकाम व्यावसायिकांकडून याबाबतचे हमीपत्र घेण्यात यावे, त्यानंतरच बांधकाम पूर्णत्वाचा दाखला द्यावा, अशाही सूचना पाटील यांनी संबंधितांना दिलेल्या आहेत.
















