न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ जुलै २०१९) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘वायसीएमएच’ रुग्णालयात अत्यंत गुंतागुंतीची आणि अवघड असलेली शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली. एका ३० वर्षीय महिलेच्या मेंदूमध्ये गाठ तयार झाली होती. महिलेला कायमस्वरूपी अपंगत्व येण्याबरोबरच आवाज जाण्याची भीती अधिक असल्याने केवळ शस्त्रक्रिया केल्या जाणा-या भागात भुल देऊन मेंदूची गाठ काढून महिलेला जीवनदान देण्याची किमया तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने केली आहे. ही शस्त्रक्रिया शहरात पहिल्यांदाच झाली असून महापालिकेच्या रुग्णालयात मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. तर, एका व्यक्तीच्या कवटीमध्ये हाड घुसले होते. दुर्बिणद्वारे ती शस्त्रक्रिया यशस्वी केली असू हा रुग्ण आता व्यवस्थित चालत आहे. वायसीएमएच रुग्णालयातील डॉक्टरांनी दोघांना जीवनदान दिले आहे.
या दोन्ही शस्त्रक्रियेची माहिती रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांनी आज (बुधवारी) पत्रकार परिषदेत दिली. मेंदूतज्ज्ञ डॉ. अमित वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली या शस्त्रक्रिया झाल्या. डॉ. हर्षद चिपडे, डॉ. मारूती गायकवाड, डॉ. प्रविण सोनी, परिचारिका शेटे, युनूस पगडीवाले यांच्या टीमने या शस्त्रक्रिया यशस्वीपणे केल्या. महापौर राहुल जाधव, आयुक्त श्रावण हर्डीकर, सभागृह नेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी उपस्थित होते.
डॉ. राजेश वाबळे म्हणाले, ‘वायसीएमएच रूग्णालयात दररोज हजारो रूग्णांवर उपचार केले जातात. केंद्र सरकारने काही महिन्यांपूर्वी वायसीएम रूग्णालयामध्ये पदव्युत्तर पदवीचे शिक्षण देणारे अभ्यासक्रम शिकविण्यास मान्यता दिलेली आहे. याची यंदाची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली असून विविध विषयातील २३ तज्ज्ञ डॉक्टर आता रूग्णालयात निवासी डॉक्टर म्हणून २४ तास कार्यरत राहणार आहेत.
सभागृह नेते एकनाथ पवार म्हणाले, ‘वायसीएएमच रुग्णालय अनेक रुग्णांना वरदान देत आहे. अवघड शस्त्रक्रिया मोफत केल्या जात आहेत. या शस्त्रक्रिया खासगी नामांकित रुग्णालयात देखील केल्या जात नाहीत. वायसीएमएच रुग्णालय आयुष्याची सुरुवात करणारे आहे. वायसीएमएच रुग्णालयाचा दर्जा सुधारला आहे. पदव्युत्तर संस्था सुरु झाली आहे. त्यामुळे वायसीएमएचसाठी अनेक डॉक्टर उपलब्ध होणार आहेत.’
















