न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ जुलै २०१९) :- चिंचवड येथील श्रीमान महासाधू मोरया गोसावी समाधी मंदिर परिसरात दिवसेंदिवस गर्दी वाढत आहे. मात्र, परिसरातील वाढत्या अतिक्रमणामुळे आणि बेशिस्त पार्किंगमुळे वाहतुकीची समस्या भेडसावात आहे. त्यामुळे दररोज दर्शनासाठी जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना त्यातून कशीबशी वाट काढून जावे लागते.
सध्या मंदिर परिसरात अतिक्रमणांची संख्या वाढत आहे. येथील महात्मा फुले उर्दूशाळेपासून ते समाधी मंदिरापर्यंत दोन्ही बाजुला विविध हातगाडी व खाद्यपदार्थांच्या दुकानांचे अतिक्रमण झाले आहे. मात्र, त्याकडे कोणीही महापालिका अधिकारी वा लोकप्रतिनिधी लक्ष देत नाहीत. याच परिसरात-जिजाऊ पर्यटनस्थळ आहे. तसेच, या ठिकाणी नागरिकांची गर्दी होते. तेथे दुचाकी अस्ताव्यस्त लावण्यात येतात. त्यामुळे येथील वाहतुकीला मोठा अडथळा होतो. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी लक्ष घालून अतिक्रमणे हटवावीत, अशी मागणी ज्येष्ठ नागरिक रमेश देव यांनी पत्राद्वारे केली आहे.
















