न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ जुलै २०१९) :- टाटा मोटर्स कंपनीने २०० पैकी एकही सीएनजी बस अद्याप पीएमपीएमएलला दिलेली नाही. निश्चित मुदतीमध्ये बसपुरवठा न केल्याने पीएमपीएमएलने कंपनीस कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. अटी व शर्तीनुसार कंपनीस प्रतिदिन प्रतिबस १० हजार रुपये दंड केला जाणार आहे. कंपनीस पुन्हा बजावून सक्त कारवाई करण्याची सूचना स्थायी समितीचे अध्यक्ष व सुना पीएमपीएमएलचे संचालक विलास मडिगेरी यांनी दिली आहे.
पीएमपीएलने २०० सीएनजी बसेस थेट पद्धतीने येथील टाटा मोटर्स कंपनीकडून खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. त्याची ऑर्डर कंपनीस एप्रिल महिन्यात देण्यात आली होती. करारानुसार कंपनीने जूनमध्ये ७४, जुलैमध्ये ८४ आणि उर्वरित ४२ बसेस ऑगस्टमध्ये देण्याचे कबूल केले होते. मात्र, अद्याप एकही बस कंपनीने पीएमपीएलला दिलेली नाही. त्यामुळे पीएमपीएलने कंपनीला नोटीस दिली आहे, अशी माहिती पीएमपीएलच्या अध्यक्षा नयना गुंडे यांनी बुधवारी (दि. ३) रोजी झालेल्या संचालकांच्या बैठकीत दिली.
यावर मडिगेरी यांनी संताप व्यक्त केला. कंपनीवर ठोस कारवाई करण्याबाबत पुन्हा खरमरीत शब्दात नोटीस बजावा, असे निर्देश त्यांनी दिले. येत्या गुरुवारी (दि. ११) रोजी होणाच्या बैठकीत कंपनीच्या अधिका-यांना बोलावून त्यांच्याकडून खुलासा घेण्यात येणार आहे.
या बैठकीस महापौर राहुल जाधव, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, आयुक्त श्रावण हर्डीकर, पुणे महापालिका स्थायी समिती अध्यक्ष सुनील कांबळे, सीआरटीचे संचालक कॅप्टन राजेंद्र पाटील, संचालक व अधिकारी उपस्थित होते.
















