न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ जुलै २०१९) :- शहरातील विविध ठिकाणी कचरा न टाकण्याचे आवाहन करणारे फलक लावावे व कचरा उचलणा-या वाहनांची संख्या व फे-या वाढवाव्यात अशा सूचना महापौर राहूल जाधव यांनी दिल्या.
प्रभागस्तरावरील अडचणी व विकास कामांबाबतच्या आढावा बैठकांचे आयोजन सर्व प्रभाग कार्यालयांमध्ये त्यांनी केले असून आज क प्रभागाची बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली झाली त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला स्थायी समिती सभापती विलास मडीगेरी, क प्रभाग अध्यक्षा यशोदा बोईनवाड, शहर
सुधारणा समिती सभापती राजेंद्र लांडगे, नगरसदस्या नम्रता लोंढे, गीता मंचरकर, प्रभाग समिती स्वीकृत सदस्य गोपीकृष्ण धावडे, सागर हिंगणे, वैशाली खाडे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.अनिल रॉय, मुख्य उद्यान अधिक्षक सुरेश साळुंके, आरोग्य कार्यकारी अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफळे, कार्यकारी अभियंता संजय घुबे, रविंद्र पवार, नितीन देशमुख, प्रदीप पुजारी, प्रशासन अधिकारी प्रभावती गाडेकर,आर.एम. घुले, क्रिडा अधिकारी रज्जाक पानसरे आदि उपस्थित होते.
यावेळी महापौर राहुल जाधव यांनी कचरा वेळच्यावेळी उचलणे, कचरा वाहतूक गाड्यांची संख्या वाढवून फे-या वाढविणे, ठिकठिकाणी कचरा न टाकण्याचे आवाहन करणारे फलक लावणे, ओला व सुका कचरा वेगळे करण्याचे सुयोग्य नियोजन करणे इ. बाबत संबधितांना सूचना दिल्या. तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्याविषयी विशेष काळजी घेवून सर्व शाळा स्वच्छ ठेवणेबाबत विशेष लक्ष देण्यास सांगितले. मनपाच्या ताब्यातील मोकळ्या जागांवर कुंपणालगत वृक्ष लागवड करण्याबाबतच्या सूचनाही उद्यान अधीक्षक सुरेश साळुंखे यांना महापौर राहुल जाधव यांनी दिल्या. तसेच सर्व भागांत समान पाणीपुरवठा करण्याचे आदेश त्यांनी संबधित अधिका-यांना दिले.
स्थायी समिती सभापती विलास मडीगेरी म्हणाले, कचरा वाहन मॉनीटरिंग करणारे अॅप विकसित करून सर्व नगरसदस्यांना द्यावे जेणेकरून त्यांना प्रभागातील कचरा वाहक गाड्यांची सर्व माहिती मिळणे शक्य होईल. तसेच कचरा वाहनांच्या रूट प्लॅनचे पत्रक प्रभागातील नगरसदस्य, संबधित अधिकारी यांच्या मोबाईल नंबरसह नागरिकांना घरोघरी वाटावे. कचरा वाहनांच्या फे-या वाढविण्याबाबतही त्यांनी संबधित अधिका-यांना सूचना केल्या. वृक्ष लागवडीबाबत सर्व सदस्यांना माहिती द्यावी व अशा ठिकाणी नगरसदस्यांच्या भेटीचे नियोजन करावे अशा सूचनाही त्यांनी अधिका-यांना दिल्या. तसेच रस्त्यावरील खड्डे योग्य पद्धतीने तत्काळ बुजविण्यात यावेत असेही ते म्हणाले.


















