न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ सप्टेंबर २०१९) :- महाराष्ट्र राज्य सहकारी बँक गैरव्यवहारप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) मुंबईतील कार्यालयात शुक्रवारी स्वत:च उपस्थित राहणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर केले होते. त्यानंतर खबरदारी म्हणून मुंबई पोलिसांकंडून कुलाबा, कफ परेड, मरीन ड्राइव्ह, आझाद मैदान, डोंगरी, जे. जे. मार्ग, एमआरए मार्ग या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत जमावबंदीचे आदेश दिले होते. याव्यतिरिक्त अनेक ठिकाणी नाकाबंदीही करण्यात आली होती. दुपारी पावणे दोनच्या सुमारास खुद्द शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधत आपण तूर्तास ईडीच्या कार्यालयात जाण्याचा निर्णय स्थगित केल्याची माहिती दिली.
तूर्तास कोणत्याही चौकशीची सध्या गरज नसून आवश्यकता असल्यास चौकशीसाठी बोलवण्यात येईल, असा ईमेल ईडीकडून शरद पवार यांना पाठवण्यात आला होता. तसंच त्यांनी ईडीच्या कार्यालयात जाऊ नये यासाठी मनधारणी करण्यासाठी सहाय्यक पोलीस आयुक्त आणि पोलीस आयुक्तांनी त्यांची भेट घेतली होती. त्यानंतर काही वेळाने शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी आपण तूर्तास ईडीच्या कार्यालयात जाण्याचा निर्णय तहकूब केला असल्याची माहिती दिली. तसंच यानंतर आपण पुण्यात पूरग्रस्तांची भेट घेण्यासाठी जाणार असल्याचे ते म्हणाले.
ईडीने शरद पवार यांना सध्या तुमच्या चौकशीची गरज नसून येण्याची काही गरज नसल्याचं सांगितलं आहे. तसंच भविष्यात गरज लागेल तेव्हा तुम्हाला आम्ही नोटीस किंवा समन्स पाठवू त्यांनतर तुम्ही येऊ शकता असं ईडीकडून सांगण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनीदेखील ईडीकडून मेल आला असल्याचं दुजोरा दिला आहे.












