न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ ऑक्टोबर २०१९) :- राष्ट्रवादी काँग्रेसने पिंपरी मतदार संघात नगरसेविका सुलक्षणा शिलवंत-धर व माजी आमदार अण्णा बनसोडे या दोघांनाही एबी फॉर्म दिल्याने कार्यकर्त्यांचा गोंधळ उडाला आहे. माघार कोणाला घ्यावी लागणार याबाबतची उत्कंठा ताणली गेली आहे.
पिंपरी विधानसभा मतदारसंघ राखीव आहे. आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेसने नगरसेविका सुलक्षणा शिलवंत – धर यांना काल उमेदवारी जाहीर केली होती. त्यामुळे राष्ट्रवादीतील इच्छुक असलेले माजी आमदार बनसोडे व शेखर ओव्हाळ यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच बंडखोरी करून अपक्ष लढण्याचा इशारा दिला. त्यामुळे पक्षात खलबते झाली आणि उमेदवार बदलण्यात आला.
राष्ट्रवादीच्या एबी फॉर्मसह धर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर बनसोडे यांनीही एबी फॉर्मसह उमेदवारी अर्ज दाखल केला. दोघांनीही आपणच पक्षाचे अधिकृत उमेदवार असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस कोणाला माघार घ्यायला लावणार हे ७ ऑक्टोबरला स्पष्ट होणार आहे.











