न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे :- मारहाण झालेल्या मित्राला रेक्टरकडे जाण्याचा सल्ला दिल्याने एका विद्यार्थ्यावर सहा जणांनी रॅगिंग केले. पिडीत विद्यार्थ्याच्या छातीवर, पोटावर आणी इतर ठिकाणी लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. तसेच त्याच्या डोक्यात आरसा फोडून गंभीर जखमी करण्यात आले.
तु पुण्यात कसा रहातो, तुला संपवूनच टाकतो अशी धमकीही देण्यात आली. या घटनेची गांभीर्याने दखल घेत कोंढवा पोलिसांनी चार विद्यार्थ्यांना अटक केली असून दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.
पिडीत १९ वर्षीय विदयार्थी सिंहगड अभियांत्रीकी महाविद्यालयाच्या येवलेवाडी येथील हॉस्टेलमध्ये रहातो. त्याच्या मित्राला हॉस्टेलमधील व महाविद्यालयातील काही विद्यार्थ्यांनी मारहाण केली होती. त्याची विचारपूस करण्यासाठी पिडीत विद्यार्थी गेल्यावर त्याने मित्राला रेक्टर व प्राचार्याना कळविण्याचा सल्ला दिला होता. ही बाब संबंधीत सहा विद्यार्थ्यांना कळताच ते शनिवारी पहाटे पिडीत विद्यार्थ्याच्या हॉस्टेलमध्ये जबरदस्तीने घुसले. यानंतर त्याच्या रुममध्ये जाऊन त्याला जाब विचारत लाथा-बुक्कयांनी बेदम मारहाण केली.
त्याच्या डोक्यात आरसा फोडून डोळ्यावर बुक्की मारून गंभीर जखमी केले. इतकेच नव्हे तर त्याला रुममध्ये कोंडवून ठेऊन जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली. यानंतर त्याला हाता-पाया पडायला लावून यापुढे आम्हाला भाई म्हणायचे असे धमकावत काढता पाय घेतला. या घटनेने घाबरलेला पिडीत विद्यार्थ्यी काही दिवस मानसिक ताणतणावात होता. यामुळे त्याने लगेचच तक्रार दिली नाही. आज अखेर या विद्यार्थ्याने धाडस दाखवत कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
याप्रकरणी चार विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली असून, दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याविरुध्द १३५, महा. प्रोव्हि. ऑफ रॅगिंग ऍक्ट १९९९ चे सह कलम ४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक एस.एस.काळे यांनी दिली आहे
















