न्यूज पीसीएमसी नेटवर्क
भोसरी :- भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून अचानक मुंबईचे आवातण आल्यामुळे भारतीय जनता पक्षाचे सहयोगी सदस्य व भोसरी विधानसभेचे अपक्ष आमदार महेश लांडगे तातडीने मुंबईस रवाना झाल्याची माहिती, अधिकृत सूत्रांकडून न्यूज पीसीएमसीच्या हाती आली आहे.
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर भोसरी विधानसभेस मंत्रिपदाची लॉटरी लागणार असल्याची चर्चा, वर्तुळात सुरु असून या निम्मिताने आमदारांनी जोरदार लौबिंग केले आहे. कोणत्याही परिस्थितीत आमदार नामदार होणारच, याकरिता जोरदार फिल्डिंग सुरु आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या राजकारणात मा. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि मा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वर्चस्व वाढत असून हल्लाबोल तसेच इतर आंदोलनाच्या निम्मिताने राष्ट्रवादीने सत्ताधाऱ्यांना जोरदार विरोध केला असून, मोठी जरब बसविली आहे. त्यामुळे आमदार जगताप व आमदार लांडगे यांना बळ देण्याशिवाय कोणताच पर्याय सध्या पक्षश्रेष्ठींकडे नाही.
त्यामुळे शहरात सत्ता टिकवून ठेवायची असेल तर, पिंपरी चिंचवड शहराला मंत्रिपद द्यावेच लागेल. त्यानिमित्ताने जोरदार वातावरण निर्मिती करण्याचे षड्यंत्र भाजपकडून सुरु आहे. पिंपरी चिंचवड शहराला राज्यात मानाचे पान द्यावे कि न द्यावे, द्यावे तर कोणाला? कारण रामाला द्यावे तर लक्ष्मण नाराज होणार व लक्ष्मणाला द्यावे तर राम नाराज होणार, यावरून श्रेष्ठी संभ्रमात सापडले असून, मंत्रिपदाबाबत खलबते सुरु आहेत. त्याचाच हा एक भाग असून यात बाजी लक्ष्मण मारणार कि राम याबाबत उत्सुकता आणखी शिगेला पोहोचली आहे.
















