- प्रीत हा प्रथमतःच हुशार विद्यार्थी, त्याची आकलन क्षमताही उत्तम – संदीप काटे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ फेब्रुवारी २०२०) :- जगातील १९७ देशांची नावे अवघ्या ९४ सेकंदात बोलुन दाखवत ‘वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडीया’ या किताबामध्ये नाव नोंदविलेल्या प्रीत राजेश शिरोडकर या इयत्ता दुसरीतील विद्यार्थ्याचा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते महापौर दालनात गौरव करण्यात आला.
प्रीत शिरोडकर हा पिंपळे सौदागरमधील चॅलेंजर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दुसरीमध्ये शिकत आहे. त्याने सलग दुस-यांदा हा विश्वविक्रम केला असून, पिंपरी चिंचवड शहराच्या नावलौकीकात भर घातली आहे. त्याबद्दल आज त्याचा गौरव करण्यात आला. यावेळी महापौर उषा उर्फ माई ढोरे, चॅलेंजर पब्लिक स्कूलचे संस्थापक, अध्यक्ष संदीप काटे, शाळेच्या मुख्यध्यापिका, पालक आदी उपस्थित होते.
महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी प्रीत शिरोडकर याचे कौतुक केले. पिंपळे सौदागर परिसर स्मार्ट आहेच. परंतु, येथील शाळेत शिकणारे विद्यार्थीही अधिक स्मार्ट होत आहेत. अशा या स्मार्ट विद्यार्थ्यांचे पालक, शिकविणारे शिक्षक यांच्या प्रयत्नामुळेच प्रीत शिरोडकरसारखी मुलं शहरचं व स्वतःच्या शाळेचे नाव मोठ करताना दिसत आहेत. अशा गुणी मुलांसाठी महापालिकाही आपले योगदान देत राहील, असे सांगितले.
चॅलेंजर पब्लिक स्कूलचे संस्थापक, अध्यक्ष संदीप काटे यावेळी म्हणाले की, प्रीत शिरोडकर हा आमच्या चॅलेंजर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दुसरीमध्ये शिक्षण घेत आहे. प्रीत हा प्रथमतःच हुशार विद्यार्थी असून, त्याची आकलन क्षमता अतिशय उत्तम आहे. शाळेतील शिक्षकांनाही याचा वेळोवेळी प्रत्यय आला आहे. त्यामुळेच प्रीतची वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडीया या संस्थेने दखल घेतली. अशा गुणी मुलांसाठी शाळेतील वातावरण नेहमीच प्रसन्नदायक ठेवण्यात येते व तसा शाळेतील शिक्षकांचाही याकडे कटाक्ष असतो. प्रीतच्या या अनोख्या विक्रमामुळे शाळेचे नाव जगभरात पोहोचले आहे. प्रीतच्या पुढील वाटचालीस त्यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.











