- पालिकेच्या निमंत्रण पत्रिकेवर राज शिष्टाचारानुसार पालकमंत्र्यांचे नाव हवेच – आमदार लांडगे
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ फेब्रुवारी २०२०) :- महापालिकेच्या मोठ्या रक्कमेच्या निविदा प्रक्रियेत वारंवार शंका उपस्थित केल्या जातात. पालिकेची बचत व्हावी, म्हणून प्रशासन आणि सल्लागार निविदा अटी व शर्तीमध्ये बदल करतात. त्यात शहराचा फायदा आहे. अशा सूचना करण्यात गैर काय? असा सवाल आमदार लक्ष्मण जगताप यांनी उपस्थित केला. मात्र, वाढीव दराने निविदा प्राप्त झाल्या असतील तर, त्या रद्द करू असे त्यांनी स्पष्ट केले.
यांत्रिक पद्धतीने रस्ते सफाई, उद्यानविषयक कामे तसेच, पाणीपुरवठ्याच्या जलवाहिनीकामाची निविदा प्रक्रिया प्रशासन राबवित आहे. त्यातील अटी व शर्ती सोईस्करपणे बदण्यात आल्या आहेत. त्यात अधिकारी व ठेकेदारांनी रिंग केल्याचा आरोप होत आहे. या संदर्भात पत्रकार परिषदेत प्रश्न उपस्थित केल्यानंतर ते बोलत होते.
आयुक्त श्रावण हर्डीकर यांची बदली करावी, अशी मागणी तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्याचा जगताप व आ . महेश लांडगे यांनी इन्कार केला. आयुक्त योग्य रितीने काम करीत असल्याचा दावा त्यांनी केला. पालिकेच्या निमंत्रण पत्रिकेवर राज शिष्टाचारानुसार पालकमंत्री अजित पवार यांचे नाव असले पाहिजे, असे आमदार महेश लांडगे म्हणाले.
मोठ्या प्रकल्पाबाबत निविदा प्रक्रिया सुरू असताना रिंग आणि भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करणे चुकीचे आहे. निविदा नियमाच्या चौककटीत विविध टप्प्यानुसार राबविली जाते. त्यात काही गैर आढळल्यास ती रद्द करून फेरनिविदा काढली जाते. या पूर्वी अनेक निविदा रद्द केल्या आहेत. तसेच, स्मार्ट सिटीतील एक निविदा रद्द केली आहे. तक्रार करणाऱ्यांनी ठोस पुरावे मिळाल्यास त्या निविदा प्रक्रियेची तपासणी करून कारवाई केली जाईल, असे पालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्पष्ट केले.