- स्थानिक नगरसेवक व महापालिकेची बदनामी
- भाजपचे चिंचवड विधानसभा अध्यक्ष राज तापकीर यांची आयुक्तांकडे तक्रार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ फेब्रुवारी २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग क्र. २७ तापकीरनगर, श्रीनगर, रहाटणी-काळेवाडीमध्ये चालू असलेल्या विविध विकासकामांमध्ये अडथळा आणणाऱ्या समाजकंटक व स्थानिक गावगुंडावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे चिंचवड विधानसभा अध्यक्ष राज तापकीर यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
आयुक्तांना दिलेल्या निवेदनात तापकीर यांनी म्हटले आहे की, ‘गेली १० वर्षे रहाटणी-काळेवाडी, तापकीरनगरमध्ये कोणत्याही प्रकारची विकासकामे झालेली नव्हती. २०१७ च्या महापालिका निवडणुकीत तत्कालीन नगरसेवकांना या प्रभागातील जनतेने नाकारले. प्रभागात परिवर्तन घडवीत जनतेने भाजपच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून दिले. या प्रभागातील नगरसेवकांनी विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढविली. प्रभागातील नगरसेवक केवळ विकास हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून, गेल्या तीन वर्षांपासून रात्रंदिवस जनतेला दिलेल्या विकासाच्या आश्वासनांच्या पूर्ततेसाठी झटत आहेत. मात्र, परिसरातील समाजकंटक व स्थानिक गावगुंड अंतर्गत विकासकामांना खो घालताना दिसतात, असेही तापकीर यांनी म्हटले आहे.
माझा स्वतःचा सामाजिक कार्यकर्ता व एका जबाबदार पक्षाचा पदाधिकारी या नात्याने प्रभागातील नागरिकांमध्ये वावर असतो. या दरम्यान नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना वाचा फोडण्याचे काम मी प्रामाणिकपणे करीत आहे. प्रभागात सुरु असलेल्या विकासकामांना विलंब होत असल्याच्या अनेक तक्रारी नागरिकांनी माझ्या निदर्शनास आणून दिल्या. याबाबत मी स्वतः या विकासकामांचे सर्वेक्षण केले असता असे समजले की, प्रभागात सुरु असणाऱ्या विकासकामांना स्थानिक गावगुंड व समाजकंटक अंतर्गत विरोध करीत असून, प्रसंगी महापालिका अधिकारी व त्या कामांचे संबंधित ठेकेदार याना दमदाटी करून मुद्दामून कामांना खो घालीत आहेत. त्यामुळे प्रभागातील कामांना विलंब होत असून, नागरिकांना उद्भवणाऱ्या गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे प्रभागातील नागरिक विलंबाने होणाऱ्या विकासकामांचे खापर प्रभागातील नगरसेवक व पर्यायाने महापालिकेवर फोडत असल्याचे प्रत्यक्षदर्शी दिसत आहे, असेही तापकीर यांनी म्हटले आहे.
प्रभागात सुरु असणाऱ्या विकासकामांची आपण स्वतः जातीने पाहणी करावी. विकासकामांना अडथळा आणणाऱ्या समाजकंटकांकडून व स्थानिक गावगुंडांकडून होणारी अंतर्गत अडवणूक मोडीत काढावी. प्रसंगी संबंधित ठेकेदाराला सुरक्षा पुरवून विलंबाने सुरु असणाऱ्या विकासकामांना गती द्यावी. महापालिका आयुक्त या नात्याने आपण प्रभागातील विकासकामांना अडथळा आणणाऱ्या स्थानिक गावगुंडांवरही कायदेशीर कारवाई करावी, असे या निवेदनात राज तापकीर यांनी म्हटले आहे.