- सत्ताधाऱ्यांकडून महापौरांच्या आसनासमोरील मानदंडाभोवती सुरक्षा कवच…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ फेब्रुवारी २०२०) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महासभेदरम्यान गोंधळ झाल्यावर मानदंड पळविण्याची जणू काही प्रथाच सुरू झाली आहे. विरोधकांची भाजपने चांगलीच धास्ती घेतल्याच आज स्पष्ट झाले. सभेतील गोंधळादरम्यान आंदोलन करताना मानदंडाजवळ हात पोहचू नये, यासाठी महापौराच्या समोरील डायससमोर बदल करण्यात आले आहेत.
त्यासाठी कोणालाही विश्वासात घेतले नसल्याचे समोर आले असून अतिरिक्त फर्निचरही करण्यात आले आहे. महापालिकेच्या दर महिन्याच्या महासभेमध्ये शहरातील प्रश्नावर चर्चा केली जाते. यामध्ये एखादा मुद्दा अथवा सत्ताधाऱ्यांचा निर्णय पटला नाही तर विरोधक आंदोलन करतात. त्यासाठी महापौर, आयुक्त व नगरसचिव यांच्यापुढील डेस्कसमोर जाऊन घोषणा देतात. तसेच समोर ठेवलेला मानदंड हिसकावून सभेमध्ये गोंधळ घातला जातो.
डायसवर ठेवलेल्या मानदंडाला हात लावता येऊ नये, यासाठी डायससमोर बदल करण्यात आला असून अतिरिक्त फर्निचर करून मानदंडापर्यंत हात पोहोचणार नाहीत, याची खबरदारी घेण्यात आली आहे. विशेष म्हणजे याबाबत नगरसदस्यांना कल्पनाही देण्यात आली नाही. अशा पद्धतीने गूपचूप काम केल्यामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टिका केली.
मानदंड, महापौर सुरक्षित रहावेत, यासाठी हा बदल केला आहे. त्यामध्ये वावगे काही नाही. इतर महापालिकांमध्ये अशाप्रकारे बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे आपल्या सभागृहामध्ये हा बदल केला आहे. विरोधक त्यांचे काम करत आहेत. त्यावर बोलणे योग्य नाही.
– माई ढोरे, महापौरसभागृहामधील फर्निचरमध्ये बदल करायचा होता, तर आम्हाला विश्वासात घ्यायला पाहिजे होते. हा बदल कुणासाठी केला आहे. मानदंडाला हात लावणे किंवा तो पळविणे ही प्रथा आहे. त्यातून विरोध दाखवता येतो. अशाप्रकारे काहीही कामे मंजूर केली जातील. याबाबत आयुक्त, अधिकारी यांना जाब विचारणार आहे हे कोणाच्या सांगण्यावरून आणि का केले आहे ते समोर येणे आवश्यक आहे.
– राहुल कलाटे, गटनेते शिवसेना