न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ फेब्रुवारी २०२०) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या पंतप्रधान आवास योजनेतील चर्होली, रावेत आणि बो – हाडेवाडी या ३ गृहप्रकल्पातील ३ हजार ६६४ सदनिकांसाठी नव्याने अर्ज घेण्यात येणार आहेत. त्यासाठी प्रत्येक अर्जासाठी ५ हजार रूपयांचा डीडी (डिमांड ड्राफ्ट) न घेता, तीनही अर्जासाठी केवळ ५ हजारांचा एक डीडी घेण्यात यावा, या उपसूचनेसह पालिका सभेत हा विषय मंजूर करण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर उषा ढोरे होत्या.
पालिकेच्या चऱ्होली, रावेत, डुडुळगाव, दिघी, बो-हाडेवाडी, वडमुखवाडी, चिखली, आकुर्डी या ठिकाणी पंतप्रधान आवास अंतर्गत गृहप्रकल्पात ९ हजार ४५८ सदनिका उभारल्या जाणार आहेत. त्यापैकी वरील तीन गृहप्रकल्पासाठी नव्याने अर्ज मागविण्यात येणार आहेत. त्यासाठी अर्ज भरताना ५ हजार रुपयांचा डीडी भरावा लागणार आहे. अर्ज ऑनलाईन भरून कागदपत्रांसह नागरी सुविधा केंद्राकडे सादर करावा लागणार आहेत. त्यातून पात्र अर्जदाराची लॉटरी पद्धतीने ही सोडत काढली जाणार आहे.
लाभार्थ्यास आपला हिस्सा ४०, ४० आणि २० टक्के असा ३ टप्प्यात भरावा लागणार आहे. इमारतीचे तीन स्लॅब झाल्यानंतर ४० टक्के, आरसीसीचे संपूर्ण काम झाल्यानंतर ४० टक्के आणि सदनिकेचा ताबा देताना २० टक्के रक्कम जमा करावी लागणार आहे. सदनिका न मिळाल्यास ५ हजार रूपये परत केले जाणार आहेत. एक व्यक्ती ३ ठिकाणासाठी अर्ज करू शकतो. अर्ज स्वीकृतीची मुदत ३० दिवस असणार आहे. एका अर्जासाठी ५ हजार रुपयांचा डीडी सक्तीचा होता. मात्र, तीनही ठिकाणच्या गृहप्रकल्पासाठी अर्ज केल्यास केवळ ५ हजार रूपयांचा डीडी घेतला जावा, अशी उपसूचना देऊन हा विषय सभेत मंजूर करण्यात आला. गृहप्रकल्पातील सर्व इमारती १४ मजली असून, ३२२ चौरस फुटाच्या सदनिका आहेत. चर्होलीसाठी एकूण ६ लाख ६९ हजार, रावेतसाठी ६ लाख ९५ हजार, आणि बो-हाडेवाडीसाठी ६ लाख ९५ हजार रूपये लाभार्थ्याला भरावे लागणार आहेत.















