न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ मार्च २०२०) :- उस्मानाबाद पोलिसांनी दुचाकी चोरणाऱ्या दोन चोरट्यांना अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून तब्बल ४४ वाहने हस्तगत केली आहेत. यापैकी १६ वाहने ही पिंपरी चिंचवड शहरातील, १६ वाहने पुणे शहरातील तर उर्वरित १२ दुचाकी वाहने इतर जिल्ह्यातील आहेत. शंकर भरत देवकुळे आणि अनिल ऊर्फ विठ्ठल अर्जुन मगर ( दोघेही रा. फकिरानगर, अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ, उस्मानाबाद) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
उस्मानाबाद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी ( दि . २ ) साडेदहा वाजताच्या सुमारास अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या बाजूला असलेल्या घरावर छापा टाकला. या छाप्यामध्ये आरोपी मगर आणि देवकुळे या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे तब्बल १४ लाख ५६ हजार ९९० रुपयांच्या ४४ दुचाकी आढळून आल्या. आरोपींकडे अधिक विचारणा केली असता त्यांनी या दुचाकी पिंपरी चिंचवड, पुणे, सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातून चोरून आणल्याची कबुली दिली.
आरोपींनी दुचाकीपैकी ११ दुचाकींची विक्री करण्यासाठी मूळ चेसीस व इंजिन नंबर पुसून टाकला. त्यावर त्याच कंपनीचा दुसरा चेसी व इंजिन नंबर टाकला. त्याआधारे बनावट वाहन नोंदणी प्रमाणपत्र तयार केले. उर्वरित ३३ दुचाकींना बनावट क्रमांक टाकले. आरोपीकडून पोलिसांनी हस्तगत केलेल्या ४४ दुचाकींपैकी १६ दुचाकी या पिंपरी चिंचवड शहरातून चोरल्या आहेत. तर पुणे शहरातून १६ दुचाकी चोरल्या आहेत. उर्वरित १२ दुचाकी सोलापूर, मुंबई आणि उस्मानाबाद जिल्ह्यातून चोरल्या आहेत.















