- शहराच्या कारभारावर माझं त्यावेळी लक्ष होतं…
- आता पालकमंत्री म्हणून ती जबाबदारी माझी – अजित पवार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ मार्च २०२०) :- खासगी क्षेत्रातील येस बँकवर आरबीआयने निर्बंध घातल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेचे कररुपाने गोळा झालेले तब्बल ९८४ कोटी रुपये अडकले आहेत. राष्ट्रीयीकृत बँकेतून पैसे काढून खासगी बँकेत पैसे ठेवण्याचं काहीही कारण नव्हत. आता शहरवासीयांचे पैसे कोण भरून देणार. शहरात माझी सत्ता होती तेव्हा या बारीकसारीक गोष्टींवर माझे लक्ष असायचे. मी शहराचा वीस वर्ष विकास केला, असं मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलं.
ते आज मावळमधील तळेगाव दाभाडे येथे एका हॉटेलच्या उदघाटनासाठी आले होते. तेव्हा त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. पुढे म्हणाले की, मोदी लाटेत आमच्यातलेच तिकडे गेले. सत्ता येऊन तीन वर्षे झाले. शहरातील नागरिक यांना तीन वर्षातच वैतागले. महापालिकेत केवळ भष्टाचार सुरु आहे. येस बँके प्रकरणी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर आणि नगरविकास खात्याकडून माहिती घेणार आहे. काहीही झाले तरी शेवटी मी जिल्हयाचा पालकमंत्री आहे. त्यामुळे मला लक्ष ठेवणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.
“जोपर्यंत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचं पाठबळ आहे तोपर्यंत या सरकारला कोणताही धोका नाही,” असं त्यांनी स्पष्ट केले. “महाविकास आघाडीचे सरकार राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस हे व्यवस्थित काम करत आहे. कोणी काय म्हटलंय त्याच्याशी काही घेणं देणं नाही,” असंही अजित पवार यावेळी म्हणाले.















