न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ मार्च २०२०) :- दुचाकीवरून येऊन नागरिकांच्या हातातील मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून नेणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना पिंपरी – चिंचवड गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून एक दुचाकी आणि २७ मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.
शुभम शिवाजी कदम ( वय १९ ), आनंद अर्जुन डोळस ( वय १९ , दोघेही रा. रुपीनगर, तळवडे ) अशी अटक केलेल्या सराईत मोबाईल चोरट्यांनी नावे आहेत.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट चारचे पोलीस वाकड परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी पोलीस कर्मचारी पांढरे आणि तुषार काळे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली. त्यानुसार धनगरबाबा मंदिराजवळ सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. दोघांकडे चौकशी केली असता त्यांच्याकडे चोरीचे तब्बल २७ मोबाईल फोन सापडले. दुचाकी आणि मोबाईल फोन असा एकूण दोन लाख ११ हजार रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला.












