- सत्ताधारी भाजपकडून राजशिष्टाचारालाही बगल – नाना काटे
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ मार्च २०२०) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते व काही नगरसदस्यांच्या उपस्थितीत औंध-पुणे रस्त्यावरील जगताप डेअरी चौकातील पुलाचे आज सोमवारी उदघाटन करण्यात आले. याबाबत महापालिकेचे विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी या उद्घाटनास विरोध दर्शविला आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, प्राधिकरणाच्या अधिका-यांशी चर्चा करुन पुलाचा उद्धघाटनाचा कार्यक्रम ठेवणे अपेक्षित होते. राजशिष्टाचाराप्रमाणे पालिकेचे सर्व पदाधिकारी तसेच विविध पक्षाचे गटनेते व प्रशासन यांच्याबरोबर चर्चा करणे आवश्यक होते. परंतु, केवळ राजकीय द्वेषापोटी महापौरांनी कोणताही राजशिष्टाचार न पाळता पालिकेच्या कोणत्याही गटनेत्यांना तसेच प्राधिकरणाच्या संबंधित अधिका-यांना कल्पना न देता घाईघाईने पुलाचे उद्घाटन केले आहे.
पुलाचे काम अद्याप बाकी आहे. राडारोडा तसेच खड्डे बुजविलेले नाहीत. पुलावरील वायरींग उघड्यावरच आहे. अशा परीस्थितीमध्ये घाईघाईने उद्धघाटन करुन पुल वाहतुकीस खुला करण्यात आलेला आहे. यामध्ये एखादा दुचाकीस्वाराचा अपघात होऊन जिवितहानी झाल्यास त्यास जबाबदार कोण? केवळ श्रेय घेण्यासाठी हा सर्व घाट घालण्यात आलेला आहे.
उद्घाटन भाजपच्या एखाद्या नगरसेवकाने केले असते तर तो प्रसिद्धीचा भाग म्हणून पाहिले असते. परंतु शहराच्या प्रथम नागरिकांनी कोणताही विधिनिषेध अथवा राजशिष्टाचार न पाळता राजकीय द्वेषापोटी सदर पुलाचे उद्घाटन करणे अत्यंत चुकीच आहे, असेही काटे यांनी म्हटले आहे.












