- कुंदा भिसे यांचा महापालिका प्रशासनाला सवाल
- उन्नति सोशल फाउंडेशन आयोजित जागतिक महिला दिन कार्यक्रमास महिलांचा प्रतिसाद …
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ मार्च २०२०) :- सध्या जगभरात करोना व्हायरसने थैमान घातलेले आहे. करोनाची पुणे व पिंपरी चिंचवड शहरात काहींना लागण देखील झालेली आहे. त्यामुळे अल्पावधीतच हा विषाणू शहरभर पसरू शकतो. मात्र, अद्यापही पिंपरी चिंचवड महापालिकेचे प्रशासन व आरोग्य विभाग या विषाणूच्या धोक्यापासून अनभीज्ञ असल्याप्रमाणे वागत आहे. शहरात करोनाचे बळी गेल्यानंतर महापालिका प्रशासन जागे होणार आहे? मुळात या रोगाचा प्रसार होण्याआधीच यावर महापालिकेकडून प्रभावीपणे जनजागृती व्हायला हवी होती. ती होताना दिसून येत नाही. त्यामुळे शहरातील महिलांनी पुढे येत, आपल्या व आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्यावी. घरातील महिला तंदुरुस्त असतील तरच, त्यांचे कुटुंब सुखी, समाधानी व निरोगी राहील. त्यासाठी महिलांनी स्वतः खंबीर होऊन ‘करोना’ या विषाणूपासून होणारा प्रादुर्भाव रोखावा व शहराचा बचाव करावा, असे आवाहन उन्नती सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे यांनी जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले.
पिंपळे सौदागर येथील उन्नति सोशल फाउंडेशनच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी समाजातील विविध क्षेत्रात समाजकार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान देखील करण्यात आला. त्याचबरोबर ‘करोना’ या विषाणूवर मात करण्यासासाठी जनजागृती व मास्क चे वाटप करण्यात आले. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी या विषाणूपासून दूर कसे रहावे, काय उपाययोजना कराव्यात, या विषाणूला विद्यार्थ्यांनी कसे सामोरे जावे, याची माहिती व मार्गदर्शनही उपस्थितांना करण्यात आले.
यावेळी जेष्ठ माता कांताबाई भिसे यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. याप्रसंगी उन्नति सोशल फाउंडेशनचे संस्थापक संजय भिसे, फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे, नगरसेवक शत्रुघ्न काटे, नगरसेविका निर्मला कुटे, स्वप्ना काटे, पी. के. स्कूलचे चेअरमन जगन्नाथ काटे, डॉ. विद्या देवरे, डॉ. अनुराधा ज्ञानमोटे, प्रा.डॉ. उल्का भिसे, अॅड. मुग्धा खान्देशे, प्राचार्या मंगला चव्हाण यांच्यासह परिसरातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, अध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवर व परिसरातील अबालवृद्ध उपस्थित होते.
कुंदा भिसे महिलांना मार्गदर्शन करताना पुढे म्हणाल्या की, आजच्या महिला प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहेत. आलेल्या आव्हानांना सामोरे जात स्वतःला त्यांनी सिद्ध केले आहे. आपल्या कर्तुत्वाद्वारे समाजापुढे नवा आदर्श उभा केला आहे. त्यामुळे आजच्या महिला या खऱ्या अर्थाने जीवनदायिनी आहेत. ‘करोना’ या विषाणूपासून महिला व अबालवृध्द सुरक्षित राहावेत, यासाठी उन्नती सोशल फाऊंडेशनने खारीचा वाटा उचलीत, मास्क व सनेटाइजर उपलब्ध करून दिले आहे. या विषाणूपासून बचावासाठी महिलांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. नोकरदार महिलांनी देखील घरी बसूनच आपली कामे ऑनलाईन करावीत व शक्य तेवढी महिलांमध्ये जनजगृती करावी, असे आवाहन देखील कुंदा भिसे यांनी यावेळी केले.
वसुधा गोडसे यांनी सूत्रसंचालन केले तर, आश्विनी भिसे यांनी आभार मानले.


















