न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ मार्च २०२०) :- पुण्यातील करोनाग्रस्तांची संख्या पाच झाली असून या सर्वांवर पुणे महापालिकेच्या नायडू रुग्णालयातील विलगीकरण कक्षामध्ये उपचार करण्यात येत आहेत. पिंपरीतही करोना व्हायरसची संशयित महिला रुग्ण आढळली आहे. ही महिला दुबईहून परतली होती. महिलेला नायडू रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
२७ फेब्रुवारी रोजी महिला दुबईहीन भारतात आली होती. महिलेमध्ये करोनाची लक्षण आढळून आल्यानंतर तिला तात्काळ नायडू रुग्णालयात हलवण्यात आलं. महिला कुटुंबासोबत राहत असल्याने तिच्या कुटुंबीयांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून वैद्यकीय तपासणी केली जात आहे. सर्वांना डॉक्टरांच्या देखरेखेखाली ठेवण्यात आलं आहे.
विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी मंगळवारी पत्रकारांना याबाबत माहिती दिली. डॉ. म्हैसेकर म्हणाले, हे दाम्पत्य फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवडय़ात ४० जणांबरोबर दुबई येथे पर्यटनासाठी गेले होते. १ मार्चला ते भारतात परतले. त्यांपैकी एकाला त्रास झाल्यामुळे ८ मार्चला त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला. करोना चाचणी सकारात्मक आल्याने त्यांना नायडू रुग्णालय येथे दाखल करण्यात आले.















