न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ मार्च २०२०) :- धुळवडीचा रंग खेळत असताना एका अल्पवयीन मुलाच्या अंगावर अॅसिड फेकल्याची गंभीर घटना समोर आली आहे. यामध्ये मुलगा गंभीर जखमी झाला आहे. अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. जखमी मुलाचे वय हे अवघे आठ वर्ष असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना मंगळवारी घडली असून रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित आरोपी मुलगा आणि गंभीर जखमी असलेला मुलगा हे दोघेही एकमेकांच्या घरासमोर राहतात. मंगळवारी सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास दोघे जण धुळवडीच्या निमित्त रंग खेळत होते. एकमेकांच्या अंगावर रंग उडवत होते. हे सर्व सुरू असताना आठ वर्षीय अल्पवयीन मुलाच्या अंगावर आरोपी अल्पवयीन मुलाने पांढऱ्या रंगाच्या बाटलीतील अॅसिड अंगावर फेकले. यात तो गंभीर भाजला आहे. तात्काळ मुलाने त्याच्या आई वडिलांना ही बाब लक्षात आणून दिली. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू करण्यात आले आहेत.
दरम्यान, अल्पयीन आरोपी विरोधात सांगवी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलाला ताब्यात घेतलं असून चौकशी केली जात आहे. या प्रकरणी जखमी मुलाच्या वडिलांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.


















