- दुय्यम निबंधक कार्यालयातील समस्या लागणार मार्गी
- माजी अध्यक्ष अॅड. राजेश पुणेकर यांची यशस्वी शिष्टाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२. मार्च २०२०) :- राज्याचे नोंदणी उपमहानिरीक्षक व मुद्रांक उपनियंत्रक हिम्मत खराडे यांनी नुकतीच दुय्यम निबंधक कार्यालय, हवेली क्र. १४ येथे भेट दिली. यावेळी त्यांना पिंपरी चिंचवड अॅडव्होकेट बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अॅड. राजेश पुणेकर, अॅड. शितल येवले, अॅड. धनंजय शिंदे, अॅड. तुषार नवले, अॅड. गणेश शिंदे, अॅड. अतुल अडसरे, ॲड. तानाजी दुधभाते, राजेंद्र वर्मा, प्रभारी दुय्यम निबंधक भोसले व कार्यालयीन कर्मचारी यांचे हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मानीत करण्यात आले.
पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अॅड. राजेश पुणेकर म्हणाले की, दुय्यम निबंधक कार्यालय, हवेली क्र. १४ या कार्यालयाचे सर्वांना चांगले सहकार्य होत आहे. मात्र, सर्व्हर प्रणालीमधील अडचणी, डिएचसी प्रणाली वारंवार बंद पडणे, ई म्युटेशन प्रणाली संथ गतीने चालणे, मुद्रांक परताव्यास लागणारा विलंब तसेच कार्यालयाची जागादेखील अपुरी पडत असल्यामुळे दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये काम करणा-या वकीलांना व पक्षकारांना याचा खुपच त्रास सहन करावा लागत आहे. या समस्या त्वरित मार्गी लागल्या पाहिजेत. त्यासाठी शासनाकडून आवश्यक ती कार्यवाही व्हायला हवी.
नोंदणी उपमहानिरीक्षक व मुद्रांक उपनियंत्रक हिम्मत खराडे म्हणाले की, दुय्यम निबंधक कार्यालय हे महाराष्ट्र शासनास सर्वाधीक महसुल मिळवून देणारे कार्यालय आहे. वकील व पक्षकारांना होत असलेल्या अडचणीबाबत मला जाणीव आहे. कार्यालयाचा विस्तार करणे, तसेच सर्व्हर प्रणालीमधील अडचणी, डिएचसी प्रणाली वारंवार बंद पडणे, ई म्यूटेशन प्रणाली संथ गतीने चालणे, मुद्रांक परताव्यास लागणारा विलंब या अडचणी दूर करण्याच्या दृष्टीने शासनाच्या वतीने लवकरच महत्वाचे पाऊल उचलण्यात येणार आहे. पुष्पगुच्छ देऊन सत्कार केल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभारही मानले.












