न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ मार्च २०२०) :- करोना विषाणूचा प्रादुर्भाव शहरात वाढला असून गर्दीच्या ठिकाणांवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच इतर कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर आता पिंपरी – चिंचवड महापालिकेची येत्या २० मार्च रोजी होणारी सर्वसाधारण सभा रद्द करण्यात आली आहे. ही सभा न घेण्याचा निर्णय सत्ताधारी भाजप पदाधिकाऱ्यांच्या वतीने घेण्यात आला आहे.
तसेच, स्थायी समिती, विषय समित्यांच्या बैठका देखील रद्द करण्याचा विचार सुरू असल्याचे सांगण्यात आले. करोना पार्श्वभूमीवर पिंपरी – चिंचवड महापालिका सत्ताधारी – भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मासिक सर्वसाधारण सभा न घेण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वसाधारण सभेला १३३ नगरसेवक व सुमारे ५० हून अधिक अधिकारी वर्ग उपस्थित असतात. हे पाहता या सद्यस्थितीत करोना विषाणूमुळे निर्माण झालेली स्थिती पाहता २० मार्च रोजीची सर्वसाधारण सभा न घेण्याचे निश्चित झाले आहे. तसेच, महापालिका स्थायी समितीसह, विषय समित्यांच्या बैठकाही तुर्तास टाळण्याचा विचार सुरू आहे. या बैठकांबाबत प्रशासनाकडून माहिती घेऊन निर्णय घेतला जाणार असल्याचे सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी सांगितले आहे.
दरम्यान, पिंपरी – चिंचवड महापालिकेचा आगामी २०२०-२१ या अर्थिक वर्षाचा आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मांडलेला अर्थसंकल्प स्थायी समितीने मंजूर केला. परंतु, स्थायी समिती सभापती निवडीमुळे महापालिकेची अर्थसंकल्पीय सभा अद्याप झालेली नाही. अर्थसंकल्पाच्या मंजुरीसाठी विशेष सभा घेणे अपेक्षित आहे. मात्र, सर्वसाधारण सभा रद्द केल्यामुळे आता महापालिकेची अर्थसंकल्पीय सभा देखील होणार नाही. ती लांबणीवर गेली. अर्थसंकल्पाच्या मंजुरीला आणखी विलंब होणार आहे.















