न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ मार्च २०२०) :- केंद्रीय हवाई उडाण विभागाच्या अहवालाचे पुनर्निरीक्षण व्हावे आणि स्थगित कारवाई नव्याने सुरू करून विमानतळ खेड सेझच्या जागेत व्हावे, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. तसे निवेदनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शिवसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष आणि इंद्रायणी इंडस्ट्रीयल असोसिएशनचे अध्यक्ष रामशेठ गावडे यांनी दिले आहे.
खेड तालुक्यातील चाकण व शिरूर तालुक्यातील शिक्रापूर, सणसवाडी परिसरात मोठी कारखानदारी आहे. या उद्योगसमूहाला आवश्यक कच्चा माल व उत्पादित माल हा विविध राष्ट्रांमध्ये थेट ने – आण करण्यासाठी विमानतळासारखी सुविधा नजीकच्या जागेत असावी अशी संघटनांची मागणी आहे.
विमानतळ झाल्यास भूमिपुत्रांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध होईल. युवकांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील. लहान – मोठे व्यवसाय भरभराटीला येतील. म्हणून विमानतळ होणे गरजेचे आहे, असे गावडे यांनी निवेदनात म्हटले आहे.













