न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ मार्च २०२०) :- महापालिकेला मिळकत करातून ४८५ कोटी ८१ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. त्यामध्ये धनादेश आणि ऑनलाइनद्वारे तब्बल ३५३ कोटी ९० लाख रूपये इतक्या रकमेचा भरणा झाला आहे. सध्या देशभरात लॉकडाऊन असल्याने महापालिकेने ज्यांना यापूर्वी वसुलीसाठी नोटीस बजावल्या आहेत, त्यांच्यावर सध्या तरी जप्तीची कारवाई करता येणार नाही. परिस्थिती निवळल्यानंतर आणि आयुक्तांचे आदेश प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करता येईल, असे सहाय्यक आयुक्त स्मिता झगडे यांनी स्पष्ट केले.
महापालिकेला चालु आर्थिक वर्षात १ एप्रिल २०१९ ते २४ मार्च २०२० या कालावधीत एकूण ४८५ कोटी ८१ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. उत्पन्नामध्ये चालू मागणीची रक्कम ही ३१५ कोटी २७ लाख रूपयांची तर, मागील थकबाकीची रकम ही १७० कोटी ५३ लाख इतकी आहे. मिळकतकर भरण्यासाठी महापालिकेची करसंकलन कार्यालये खुली आहेत. मात्र, करोना विषाणु प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर लॉकडाऊन असल्याने नागरिकांचा कल सध्या ऑनलाइन व्यवहारांकडे जास्त आहे.
महापालिका करसंकलन विभागाकडे चालू आर्थिक वर्षात ऑनलाइन व्यवहारांद्वारे १ लाख ५८ हजार ९१८ नागरिकांनी १९६ कोटी ३४ लाख रुपयांची रक्कम भरली आहे. धनादेशाद्वारे सुमारे ३३ हजार जणांनी १५७ कोटी ५६ लाख रूपये इतकी रक्कम जमा केली आहे. एनईएफटीद्वारे २६५ जणांनी ५ कोटी ५७ लाख, आरटीजीएसद्वारे ५१ जणांनी ९ कोटी ७२ लाख इतकी रक्कम भरली आहे. तर, रोख व्यवहाराद्वारे १ लाख ९ हजार ३९६ जणांनी ९७ कोटी २२ लाख इतक्या रकमेचा भरणा केला आहे.


















