न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ मार्च २०२०) :- गेल्या काही दिवसांपासून गॅस सिलेंडरची होम डिलिव्हरी वितरकांकडून बंद करण्यात आली आहे. सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पिंपळे गुरव येथे एका गॅस वितरक कार्यालयासमोर लांबच लांब रांग लागली होती. सांगवी पोलिसांनी ही गर्दी कमी करण्यासाठी थेट गॅस वितरणच थांबवून नागरिकांचे हाल वाढविले.
आठ ते दहा दिवसांपूर्वी आणि बुक केलेले सिलेंडर नागरिकांना अद्याप मिळालेले नाही. कित्येक नागरिकांकडे केवळ एकच सिलेंडर आहे. काहींचे सिलेंडर संपले आहेत. गुरुवारी सकाळपासूनच पिंपळे गुरव येथे गॅस सिलेंडर घेऊन नागरिक आले होते. प्रत्येक नागरिक दुसऱ्या नागरिकापासून विशिष्ट अंतर राखून रांगेत उभा होता. यामुळे रांग बरीच लांब झाली.
दरम्यान पोलिसांनी गॅस वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना गर्दी कमी करण्याच्या सूचना दिल्या. नागरिकांना आणि गॅस वितरकासोबत फोनवर संपर्क साधला. दरम्यान वितरक आणि पोलीस यांच्यामध्ये फोनवर वादा-वादी झाली आणि पोलिसांनी वितरण थांबविले. त्यामुळे नागरिकांना रिकाम्या हातांनी परतावे लागले.


















