न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० मार्च २०२०) :- पुण्यात करोनाचा पहिला बळी गेला असून ५२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या व्यक्तीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. या व्यक्तीच्या मृत्यूमुळे राज्यातील मृतांची संख्या आठवर पोहोचली आहे. यासोबत देशात आतापर्यंत ३० जणांचा मृत्यू झाला आहे.
पुण्यात एकूण ३१ लोक करोनाने बाधित असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. यापैकी सात जणांवर यशस्वी उपचार करुन घरी पाठवण्यात आलं आहे. मात्र आज या ५२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यांना २१ तारखेला दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. तपासणी केले असता करोनाची लागण झाली असल्याचं निष्पन्न झालं होतं. त्यांना उच्च रक्तदाब, फुफ्फुसाचा त्रास होता. त्यांच्यावर उपचार सुरु होते. आज सकाळी त्यांचं उपचारादरम्या निधन झालं.
राज्यात सध्या २१५ करोनाचे रुग्ण आहेत. गेल्या १२ तासात १२ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये पुण्यात पाच, मुंबई तीन, नागपूर दोन, कोल्हापूर एक आणि नाशिकमध्ये एक नवा रुग्ण आढळला आहे. सध्या मुंबईत सर्वाधिक ८५ रुग्ण आहेत.












