न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ एप्रिल २०२०) :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शब्ब-ए-बारात तसंच हनुमान जयंतीला घराबाहेर पडू नका असं आवाहन राज्यातील जनतेला केलं आहे. “लक्ष्मणाचे प्राण वाचवण्यासाठी हनुमानानं औषधी झाडासह संपूर्ण पर्वत उचलून आणल्याचं वर्णन रामायणात आहे.
आज जनतेला करोनापासून वाचवण्यासाठी हनुमानासारखे पर्वत उचलण्याची नाही तर घरातच थांबण्याची गरज आहे,” असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. मुस्लीम बांधवांनीही शब्ब-ए-बारातसाठी घराबाहेर पडू नये, घरातंच थांबावं असंही त्यांनी म्हटलं आहे.
“करोना संसर्गाची साखळी तोडणं आणि नागरिकांचा जीव वाचवणं हे पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपासून देशातील प्रत्येक व्यक्तीचं आज एकमेव कर्तव्यं आहे. त्यासाठी घराबाहेर न पडणं, बाहेरील व्यक्तीच्या संपर्कात न येणं, करोनाला प्रसाराची संधी न देणं आणि करोनाची साखळी तोडणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. पुढील सूचना येईपर्यंत सण, उत्सव, पूजा, अर्चा, यात्रा, जत्रा, प्रार्थना, धार्मिक कार्ये ही घरातंच करावीत, कुणीही घराबाहेर पडू नये,” असं अजित पवार यांनी सांगितलं आहे.












