न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ एप्रिल २०२०) :- फिर्यादी, ट्राफिक वॉर्डन व इतर कर्मचारी पिंपरीतील शगुन चौकात बुधवारी कर्तव्यावर होते. रात्री आठ वाजताच्या सुमारास दोन्ही आरोपी एमएच-१४-जीडब्ल्यू-५९४८ या दुचाकीवरून शगुन चौकात आले. त्यावेळी ट्राफिक वॉर्डनने त्यांना अडवून तोंडावर मास्क का लावला नाही, अशी विचारणा केली. त्यावेळी दुचाकी चालविणाऱ्या आरोपी संदीप उंदरे याने मी कोण आहे तुला माहिती आहे का, मी महापालिकेतला मोठा अधिकारी आहे. मी तुम्हाला दाखवतोच, असे म्हणून पोलीस कर्मचारी यांना धमकावू लागला.
दुचाकीच्या मागील सीटवर बसलेल्यास नाव विचारले असता त्याने अडखळत नाव सांगितले. त्यावेळी त्याच्या तोंडातून उग्र दारूचा वास आला. यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असता त्यांनी आरडा ओरडा करीत सरकारी कामात अडथळा आणला. ही घटना बुधवारी (दि. ८) रात्री आठ वाजताच्या सुमारास शगुन चौक, पिंपरी येथे घडली.
संदीप बबन उंदरे (वय ३३) आणि हिमांशू सिंग (वय २४, दोघेही रा. गावडे नगर, लिंक रोड, चिंचवड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस कर्मचारी रावसाहेब जिजाबा खोडदे यांनी बुधवारी (दि. ८) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलीस उपनिरीक्षक पुरूषोत्तम चाटे याबाबत अधिक तपास करीत आहेत.












