न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ एप्रिल २०२०) :- चिखली कुदळवाडी येथून टेम्पोमधून ८२ प्रवाशांना घेऊन उत्तर प्रदेशमध्ये निघालेल्या टेम्पो चालकास एमआयडीसी भोसरी पोलिसांनी बुधवारी (दि. ८) पहाटे मोशी टोलनाका येथे अडविले. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोविंद राम सुखहारी (वय २४, रा. इसाक ट्रान्सपोर्ट, कुदळवाडी, चिखली) आणि टेम्पोचा मालक (नाव, पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस नाईक दत्तात्रय बबन शिंदे यांनी बुधवारी (दि. ८) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गोविंद सुखहारी याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुखहारी याने एमएच-१४-डीएम-७७६१ या टेम्पोत ८२ प्रवाशांना भरून कुदळवाडी, चिखली येथून तो उत्तरप्रदेशमध्ये निघाला होता. हा टेम्पो बुधवारी पहाटे पावणे तीन वाजताच्या सुमारास मोशी टोलनाका येथे आला असता पोलिसांनी टेम्पोची तपासणी केली असता त्यामध्ये ८२ प्रवाशी दिसून आले. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब शिंदे करीत आहेत.












