- चिखली, मोशी, भोसरीनंतर आजपासून च-होलीसह पंचक्रोशीतील गावं बंद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ एप्रिल २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी मतदारसंघात येणाऱ्या समाविष्ट गावातील ग्रामस्थांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एक आगळा-वेगळा निर्णय घेतला आहे. अत्यावश्यक सेवा वगळून जीवनावश्यक वस्तूंसाठी रस्त्यावर रेंगाळणाऱ्या नागरिकांचे आवागमन रोखण्यासाठी पुढाकार घेऊन काही दिवसांसाठी गावं बंद केली आहेत. तसेच बंदच्या कालावधीत रस्त्यावर आढळणाऱ्या नागरिकांना कठोर शासन करावे, अशी मागणी देखील त्यांनी पोलिस प्रशासनाकडे केली आहे.
यात सर्वप्रथम चिखली व आजूबाजूच्या परिसरात ग्रामस्थांनी शुक्रवारपासून तीन दिवस गाव बंद केले आहे. त्यांनतर मोशी व त्यालगत येणाऱ्या परिसरात ग्रामस्थांनी शनिवारपासून चार दिवस गाव बंद केले आहेत तर, भोसरी शहर शुक्रवारपासून तीन दिवस बंद आहे.
त्यानंतर आज शनिवारी ते सोमवारी (दि. ११ ते १३ एप्रिल) या दरम्यान भोसरी मतदारसंघातील च-होली बुद्रुक, चोविसावाडी, वडमुखवाडी, डूडूळगाव व गंधर्व नगरी या परिसरातील ग्रामस्थांनी गांव बंद केले आहे. दरम्यान अत्यावश्यक सेवा म्हणजेच रुग्णालय, मेडिकल दुकान सुरु राहणार आहेत. तसा निर्णय येथील ग्रामस्थांनी घेतला असल्याची माहिती स्थानिक नगरसेविका विनया तापकीर आणि सामाजिक कार्यकर्ते प्रदीप तापकीर यांनी दिली आहे.
त्यामुळे भोसरी मतदारसंघाने एक आदर्शवत निर्णय घेऊन, भाजीपाला, राशन खरेदीसाठी नागरिकांची रस्त्यावर येणारी वर्दळ काही दिवस तरी नक्कीच थांबविली आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी तुटण्यास नक्कीच मदत होईल.