- वायसीएममधील भोंगळ कारभाराची करोना रुग्णाने केली थेट आरोग्यमंत्र्यांकडेच तक्रार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ एप्रिल २०२०) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती ( वायसीएम ) रुग्णालयात कोरोनाच्या संशयित रुग्णांना एकत्रित एकाच वॉर्डात ठेवले जात आहे. त्या सर्वांसाठी एकच शौचालय व स्वच्छतागृह असल्याने कोरोनाचा संसर्ग व प्रादुर्भाव वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. या संदर्भात एका रुग्णाने राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे व पालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे तक्रार केली आहे.
वायसीएम रुग्णालयात कोरोना संशयित रुग्णांना एका वॉर्डात ठेवण्यात येते. एकाच वॉर्डात तब्बल ३६ रूग्णांना ठेवण्यासाठी सोय आहे. कोरोना संशयित रूग्णांमुळे खराब झालेले चादर, उशी व गादी न बदलता तीच खाट नव्या रूग्णासाठी दिली जाते. नष्ट चादर व गादीवर रक्ताचे डाग कायम आहेत. तसेच, परिसरात स्वच्छतेचा अभाव आहे. वॉर्डात सर्व रूग्ण एकाच शौचालय व स्वच्छतागृहाचा वापर करतात, अशी तक्रार सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभिषेक हरिदास यांनी केली आहे.
संशयितास १२ तास एका वॉर्डात ठेवले जाते. सकाळी डॉक्टर घश्यातील द्रव्याचे नमुने घेतात. त्यानंतर १२ तासानंतर एनआयव्हीकडून कोरोनाचा अहवाल येतो. अहवालानंतर कोरोना पॉझिटीव्ह रूग्णास आयसीयु कक्षात हलविले जाते. मात्र, पूर्वीच्या वॉर्डातील खाटावरील चादर, गादी व उशी तशीच ठेवली जाते. हे साहित्य जाळून नष्ट करण्याचा वैद्यकीय नियमाकडे रूग्णालय प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. प्रत्येक ६ तासांनी मास्क बदलणे गरजेचे असताना दुसरा मास्क दिला जात नाही. रूग्णासाठी स्वतंत्र खोली नाही. त्यामुळे संशयित रूग्णांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता आहे, अशी तक्रार डॉ. हरिदास यांनी केले आहे.
कोरोना वॉर्डात पीपीई किटशिवाय डॉक्टर व कर्मचाऱ्यांना प्रवेश दिला जात नाही. दोनऐवजी आता ४ वेळा वॉर्डाची स्वच्छता करून निर्जंतुकीकरण केले जात आहे. रुग्णांसाठी मास्क व सॅनिटायझरची व्यवस्था केली आहे. प्रत्येक रुग्णास दीड मीटर लांब अंतरावरील खाटांवर ठेवले जात आहे. रुग्ण बदलल्यानंतर प्रत्येक खाट निर्जंतुक केली जाते. तसेच, शौचालय व स्वच्छतागृह नियमितपणे स्वच्छ केले जाते. जेवणाचे पॅकबंद डबे पुरविले जात आहेत, असे पालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.












