- त्याचे वाटप स्थानिक नगरसेवक व प्रशासनच्या देखरेखीखाली करावे..
- शहर सुधारणा समिती सभापती राजेंद्र लांडगे यांची आयुक्तांकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ एप्रिल २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात कोरोना विषाणु संसर्गजन्य आजाराचा फैलाव झालेने संपुर्ण शहरात संचारबंदी लागु करण्यात आलेली आहे. तसेच या विषाणुचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्याकरिता शहरातील अन्न धान्याचे दुकाने बंद ठेवण्यात आलेली आहेत व आपल्या महाराष्ट्राचे मा. मुख्यमंत्री साहेब यांच्या सुचनेनुसार परगावातील/परप्रांतातील नागरिकांना कुठेही न जाण्याचे आदेश दिले आहेत, त्या आदेशाचे पालन करुन बरेचशे नागरिक हे इतरत्र कुठेही न जाता, आहे त्या ठिकाणीच राहात आहेत. तसेच शहरातील बरेचशे नागरिकांचे कामे देखील बंद आहे, त्यामुळे आर्थिक बाबच उपलब्ध नसल्याने ब-याचशा नांगरिकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यामुळे महापालिकेने धान्य खरेदी करून प्रशासन आणि स्थानिक नगरसेवकांच्या माध्यमातून त्याचे वाटप करण्यात यावे, अशी मागणी शहर सुधारणा समिती सभापती राजेंद्र लांडगे यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, घरातील प्रमुख आणि कर्ता यांच्यावर अवलंबुन असणा-या कुटुंबातील व्यक्तींचे निदान दोन वेळेचे पोट भरता येईल, या आशेने कुटुंबप्रमुख आपापल्या प्रभागांतील नगरसेवकांकडे शेवटचा पर्याय म्हणुन पाहत आहेत. वारंवार संपर्क कार्यालये गाठुन धान्य मिळण्याकरिता विनवणी करताना दिसत आहेत. त्यांची ही दयनिय अवस्था पाहुन यावर आपल्या शहरातील महानगरपालिकेमार्फत शहरातील विकास कामांकरिता राखीव ठेवण्यात आलेला निधी हा शहरातील गरजुवंतांना धान्य वाटपासाठी वापरण्यात यावा. अशाने त्यांच्यावर आलेली उपासमारीची वेळ घालवता येईल. असे केल्याने इतर कोणत्याही परिस्थितीत (दंगलदृश्य, लुटमार) नागरिकांना सामोरे जावे लागणार नाही व आम्हा नगरसेवकांच्या माध्यमातुन प्रत्येक प्रभागात धान्य पुरवठा गरजुवंतांपर्यंत पोहचवता येईल. तसेच या धान्याचे वाटप म.न.पा.च्या मोकळ्या जागेंमध्ये सोशल डिस्टन्स राखुन नगरसेवकांच्या, म. न. पा. कर्मचारी/अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली करण्यात यावे.
या धान्य वाटपामध्ये भविष्यात जर काही भ्रष्टाचार झाल्याचे योग्य पुरावे समोर आले तर संबंधीत नगरसेवकांचे नगरसेवक पद ताबडतोब रद्द करुन पुढील पंचवार्षिक मध्ये त्यास निवडणुक लढण्यास मनाई करावी व त्यासोबत नेमणुक करण्यात आलेल्या नियंत्रित अधिका-यावरही सेवानिलंबणाची कारवाई करावी. जेणेकरुन ख-या अर्थाने गरजवंतांपर्यंत धान्य पुरवठा होईल. आयुक्तांनी या प्रस्तावाचा त्वरित विचार करुन, मा. महापौर व पक्षनेत्यांसोबत संबंधित धान्य वाटपा बाबतच्या विषयावर चर्चा करुन त्वरित निर्णय घ्यावा, असे या निवेदनात लांडगे यांनी म्हटले आहे.













