न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ एप्रिल २०२०) :- भारतीय जैन संघटना, फोर्स मोटर्स आणि पिंपरी – चिंचवड महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ‘डॉक्टर आपल्या दारी ‘ या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्याचा आत्तापर्यंत तीन हजारापेक्षा जास्त नागरिकांनी लाभ घेतला आहे.
शहरात ४ एप्रिलपासून या उपक्रमाला सुरुवात झाली. या योजनेमुळे सर्दी, खोकला, ताप आदी आजारांवर उपचार करणे शक्य आहे. या संकल्पनेतून हा उपक्रम राबविला जात आहे. रूग्णांच्या आजाराची तपासणी करून त्यांना त्यावरील औषधे देखील देण्यात येत आहेत.
ज्या भागात ही फिरती व्हॅन जाते तेथील रुग्णांना ध्वनीवर्धकाद्वारे तपासणीसाठी बोलावले जात आहे. शहरातील दाट लोकवस्ती असलेले तसेच झोपडपट्टी भागातील नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती करून तेथील नागरिकांची जास्तीत जास्त तपासणी करावी, असे आवाहन जैन संघटनेचे शहराध्यक्ष विरेश छाजेड यांनी केले आहे.


















