- रुग्णालय प्रशासनाने प्लास्टिक आच्छादन असलेले बेड रुग्णांसाठी केले तयार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ एप्रिल २०२०) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती ( वायसीएम ) रुग्णालयात कोरोना रुग्ण आणि संशयिताना अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागत असल्याच्या तक्रारी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे गेल्या होत्या. करोना आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता रूग्णालयाला महापौर उषा ढोरे आणि सत्तारुढ पक्ष नेते नामदेव ढाके यांनी भेट देऊन पाहणी केली.
रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांच्याशी चर्चा करून रुग्णालयाची स्वच्छता आणि रुग्णांची जेवणाची, राहण्याची गैरसोय होऊ नये, यासंदर्भात आवश्यक त्या सूचना त्यांनी दिल्या.
दरम्यान रुग्णालयातील डॉक्टर, परिचारकिा, वार्ड बॉय, कोरोनाचे संशयित तसेच, रुग्णालयात येणाऱ्या नागरिकांना कोरोनाची बाधा होऊ नये म्हणून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोर सॅनिटायझर टनेल लावण्यात आले आहे. तसेच, रुग्णांसाठी आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. रुग्णांच्या घशातील द्रव्य घेण्यासाठी डॉक्टरांसाठी स्वॅबचे कॅप्सूल बूथ बसविण्यात आले. तसेच रुग्ण आणि डॉक्टर, परिचारिका यांच्यात सुरक्षित अंतर राहावे, यासाठी प्लास्टिक आच्छादन असलेले बेड रुग्णांसाठी तयार केले आहे. तसेच, दोन बेडमध्ये पडदा लावण्यात आला आहे.


















