- भोसरी मतदारसंघासह झारखंड, पश्चिम बंगालच्या परप्रांतीयांना केली जीवनावश्यक वस्तूंची मदत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ एप्रिल २०२०) :- पिंपरी-चिंचवड शहर हे उद्योगनगरी म्हणून संपुर्ण भारतात ओळखले जाते. पिंपरी-चिंचवडमध्ये सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आहेत. त्यामुळे शहरातील अनेक भाग सील करण्यात आले आहे. लॉकडाउनमुळे परप्रांतीयांना रोजगार नाही. परिणामी, दैनंदिन रोजगारावर उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबाची आर्थिक घडी विस्कळीत झाली आहे. त्यामुळे या नागरिकांनी स्थानिक लोकप्रतिनिधींसह आपल्या स्वगृही अर्थात मूळ गावी असलेल्या लोकप्रतिनिधींकडे मदतीसाठी साद घातली आहे. तेथील लोकप्रतिनिधींनी मग थेट पिंपरी चिंचवड शहरातील स्थानिक लोकप्रतिनिधींना संपर्क साधण्यास सुरूवात केली.
झारंखड, उत्तरप्रदेश, पश्चिम बंगालसह राज्यातील लोकप्रतिनिधींनी भाजपा आमदार महेश लांडगे यांना संपर्क साधला. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत अवघ्या काही तासांत संबंधित कुटुंबांना मदत पोहोच करण्यात आली.
याबाबत माहिती देताना आमदार लांडगे म्हणाले की, कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर आम्ही भोसरी मतदारसंघात ‘पुन्हा एक हात मदतीचा’ या उपक्रमाची सुरुवात केली. दरम्यान झारखंड येथील खासदार अनुराग ठाकूर, यासह उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल व राज्यातील लोकप्रतिनिधींनी पिंपरी-चिंचवडमध्ये वास्तव्य करणाऱ्या झारखंडमधील कामगारांना अन्नधान्य आणि आवश्यक ती मदत उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी केली. तात्काळ आम्ही झारखंडहून पिंपरी-चिंचवडमध्ये आलेले सुमारे १५० कामगार, शिवाय इतर राज्य व महाराष्ट्रातून पिंपरी चिंचवड शहरात कामानिमित्त आलेल्या कुटुंबियांना अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तुंची मदत केली.
समन्वयक संजय पटनी म्हणाले, झारंखडचे खासदार अनुराग शर्मा, उत्तर प्रदेशमधील खासदार अनुराग ठाकूर, भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, पश्चिम बंगाल येथील भाजपाचे प्रभारी सुनील देवधर, जिंतुर-सेलूच्या आमदार मेघना साकौरे- बोर्डिकर, नागपूर येथील परिणय फुके आदींनी आमदार महेश लांडगे यांच्या जनसंपर्क कार्यालयशी संपर्क केला आहे. त्या-त्या लोकप्रतिनिधींच्या सूचनेनुसार संबंधित गरजु नागरिकांना मदत पोहोच केली आहे.


















