न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ एप्रिल २०२०) :- पुण्यात वाढत जाणारे कोरोना बाधित रुग्ण व मृत्यू दर पहाता पुणे शहर व पिंपरी चिंचवड परिसरात लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करावी, तसेच कुठल्याही परिस्थितीत रुग्णांची संख्या वाढता कामा नये, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज पुणे येथे दिले.
पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करण्यात आली होती. पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर उपस्थित होते.
“पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील कन्टेंन्टमेंट झोन परिसरात कडक निर्बंध घालण्यात यावेत. या भागातील नागरिकांना वारंवार ये- जा करता येणार नाही. त्याचबरोबर या भागातील सार्वजनिक स्वच्छतागृहे व अन्य परिसरात स्वच्छेतेची विशेष दक्षता बाळगावी. येथील नागरिकांना फ्ल्यू सदृश लक्षणे आढळल्यास त्यांनी तात्काळ तपासणी करुन घेणे गरजेचे आहे. तसेच रॅपीड टेस्टमार्फत देखील संभाव्य रुग्ण शोधण्यावर भर द्यावा. पिंपरी चिंचवडमध्ये तयार करण्यात आलेल्या ॲपच्या धर्तीवर पुण्यातही असा उपक्रम राबवावा,” असंही पवार म्हणाले
“पोलीसांच्या आरोग्य विषयक सुरक्षिततेच्या दृष्टीने मोबाईल व्हॅनव्दारे तपासणीवर भर द्यावा. तसेच पोलीसांना एन-९५ मास्क व आवश्यक ती साधने उपलब्ध करुन द्यावीत. शहर आणि ग्रामीण भागातील मजुरांसाठी कम्युनिटी किचन सुरु करावेत. यासाठी शासनाबरोबरच स्वयंसेवी संस्थांचा सहभाग घ्यावा. रेशन दुकानांव्दारे धान्य वितरण सुयोग्य व सुनियोजीत करण्यात यावे. कोणीही अन्नधान्यापासून वंचीत राहता कामा नये, याची दक्षता घ्यावी,” अशा सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.


















