- प्रभाग एकमधील चिखली-मोरेवस्तीतील गोरगरिबांना पांडाभाऊकडून मदतीचा ओघ सुरु…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ एप्रिल २०२०) :- जगभरात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेनेही कोरोनाला महामारी म्हणून घोषित केलं आहे. तसेच ही जगासाठी आरोग्यविषयक आणीबाणी असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळेच जगभरात कधीही न घडलेल्या गोष्टी होत असल्याचं पाहायला मिळत आहे. भारतासह महाराष्ट्रात देखील सर्वच जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव झालेला आहे. पिंपरी चिंचवड शहरात देखील त्यानुसार नियोजन आणि व्यवस्थापन करुन युध्द पातळीवर कामकाज सुरु आहे. मात्र, सुरुवातीचे २१ दिवस आणि त्यानंतर आता ३ मे पर्यंत वाढविलेल्या लॉक डाऊनमुळे इतर जिल्ह्यातून पिंपरी चिंचवड शहरात मजुरीसाठी, कामासाठी आलेल्या नागरिकांना आणखी काही दिवस शहरातच रहावे लागणार आहे.
ही लोकं शहरातील सर्वात जास्त दाट वस्तीचा भाग म्हणजे प्रभाग १ मधील चिखली-मोरेवस्ती या परिसरात वास्तव्यास आहेत. यात उत्तर प्रदेश, बिहार तसेच महाराष्ट्रातील बुलडाणा, बीड, जालना, परभणी आदी ठिकाणचे कामगार व मजुरांची संख्या अधिक आहे. काम बंद असल्यामुळे पैसेही शिल्लक नाहीत. त्यामुळे दोन वेळच्या जेवणाचीही समस्या त्यांच्या समोर उभी ठाकली आहे. त्यामुळे परराज्यासह राज्यातील लोकप्रतिनिधी त्यांच्या भागातील रहिवासी असणारे परंतु, कामानिमित्त भोसरी मतदारसंघातील चिखली-मोरेवस्तीत वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना मदत व्हावी यासाठी येथील स्थानिक नेते तथा भाजपचे युवा नेते पंडाभाऊ साने यांच्याशी संपर्क साधत आहेत. अशाच मदतीसाठी साने यांना बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर लोणार मतदारसंघांचे शिवसेनेचे आमदार संजय रायमुलकर यांनी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून, त्यांच्या मतदारसंघातील चिखली-मोरेवस्तीत वास्तव्यास करणाऱ्या नागरिकांना जीवनावश्यक वस्तू तथा आर्थिक मदत करण्याबाबत आर्जव केली आहे.
याबाबत पुढाकार घेऊन, बुलडाण्यातील मेहकरमधील तसेच परराज्यातील मजूर, कामगार शहरात अडकलेल्या गोर-गरिबांना देखील साने यांनी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. तसेच कोणाला काही आर्थिक मदत हवी असल्यास त्यांनी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले. मोरेवस्तीत राहणाऱ्या जवळपास दोन हजार नागरिकांना त्यांनी मदत केली आहे.
याबाबत माहिती देताना पांडाभाऊ म्हणाले की, महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील शहरात अडकलेल्या मजूर, कामगारांना सुविधा मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. माझ्या प्रभागात असेच काही मजूर व कामगार सध्या वास्तव्यास आहेत. त्यात इतर राज्यांसह बुलडाणा, बीड, जालना या भागातील कामगार असून, त्यांना मदत मिळत नसल्याने त्यांनी त्यांच्या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींशी संपर्क साधला. परराज्यासह राज्यातील विविध जिल्ह्यांमधून लोकप्रतिनिधींनी माझ्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. यात बुलडाण्याचे मेहकरचे शिवसेनेचे आमदार संजय रायमुलकर यांनी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून, त्यांच्या मतदारसंघातील चिखली-मोरेवस्तीत वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची मदत उपलब्ध करून देण्याची विनंती केली. त्यांनतर तातडीने कार्यकर्त्यासह सबंधित मजूर, कामगार व मदतीची गरज असणाऱ्या नागरिकांना प्रत्यक्ष भेटून त्यांना मदत पोहोच केली. हे करीत असताना कोरोनाबाबत शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचेदेखील पालन केले. शिवसेनेचे आमदार संजय रायमुलकर यांनी पुण्यातील मांजरीमध्ये २०० विद्यार्थ्यांसाठी जेवणाची सोय केली आहे. त्यामुळे सर्वच माध्यमातून हातावरील पोट असणाऱ्या गोरगरिबांना मदतीचा ओघ सुरु आहे.
चिखली-मोरेवस्ती परिसरात देखील मोठ्या प्रमाणावर नागरिकांना आमच्या वतीने मदत केली जात आहे. कोरोनामुळे दुकानदारांचा व्यवसाय चौपट झालेला आहे. कामगारांचे कामही बंद झाले आहे. त्यामुळे मी माझ्या मालकीच्या सदनिका, दुकान गाळे, व भाडेकरुंकडून भाडे न आकारण्याचा सहानुभूतीपूर्वक निर्णय घेतला. तसेच प्रभागातील नागरिकांसाठी स्वखर्चातून मोफत ‘ मास्क व सॅनिटायझर ’ चे वाटप घरपोच सुरु केले. ते आजही सुरु आहे. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी प्रभागातील परिसरात स्व-खर्चातून सॅनेटराइज (सोडियम हायपोक्लोराईट व बॅक्टोडेक्स औषध) कोरोना विषाणु जंतुनाशक फवारणीही केली आहे.
वेगवेगळ्या स्तरावर प्रभागात जनजागृतीचे काम सुरु आहे. नागरिकांनी या आजाराची भीती बाळगू नये. आरोग्याची काळजी घेण्याबरोबरच महापालिकेने वारंवार केलेल्या सूचनांनुसार घरी राहून स्वत:बरोबरच इतरांचीही काळजी घ्यावी, असे आवाहनही युवा नेते पांडाभाऊ साने यांनी प्रभागातील नागरिकांना केले आहे.


















