न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ एप्रिल २०२०) :- पिंपरी – चिंचवड शहरात आतापर्यंत कोरोनाबाधित दोघांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा रूग्ण असल्याने त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी कुटुंबीय व नातेवाईक पुढे येत नाहीत.
अशा बेवारस मृतदेहावर अंत्यविधी करण्याचे काम पिंपरी-चिंचवड मुस्लिम सुरक्षा संघटना करणार आहे. त्या – त्या धर्माच्या पद्धतीने अंत्यसंस्कार या समितीकडून केले जाणार आहे. मृतदेहाची हेळसांड होऊ नये म्हणून पिंपरी – चिंचवड मुस्लिम सुरक्षा संघटना स्थापन करण्यात आली आहे. त्या माध्यमातून अशा व्यक्तीवर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत, याबाबत महापालिका आयुक्त यांनी मंजुरी दिली आहे.
माहिती देताना रफिक करेशी म्हणाले की, कोरोनाबाधित मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन पिंपरी – चिंचवड मुस्लिम सुरक्षा संघटना स्थापन केली आहे. त्या माध्यमातून मृतांवर मुस्लिम पद्धतीने अंत्यविधी केला जाईल. त्यावेळी त्या ठिकाणी कोणाला प्रवेश दिला जाणार नाही. तसेच, हिंदू व इतर धर्मीय व्यक्तीचाही अंत्यविधी केला जाईल. ही सेवा विनामूल्य केली जाणार आहे. शासन व पालिकेने लागु केलेल्या सर्व अटीचे पालन करून हे कार्य केले जाईल.


















