- सध्याच्या कोरोना तपासणीत निगेटिव्ह निघूनही, रुग्ण पुन्हा होतात रुग्णालयात दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ एप्रिल २०२०) :- कोरोना संशयिताची टेस्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले होते; मात्र काही दिवसांनंतर त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करावे लागले. म्हणूनच सर्व वैद्यकीय आणि आरोग्य संस्थांनी कोरोना विषाणूबाधित रूग्णास रक्त तपासणीद्वारे विषाणूमुक्त आढळल्याशिवाय डिस्चार्ज देऊ नये, अशी मागणी केअर ऑफ पब्लिक सेफ्टी असोसिएशनतर्फे करण्यात आली आहे.
याबाबत असोसिएशनचे डॉ. अभिषेक हरिदास यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ई – मेलद्वारे निवेदन दिले आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, मानवी शरीरात कोरोना व्हायरस शोधण्यासाठी विविध चाचण्या घेतल्या जातात. परंतु, कोरोना व्हायरसच्या संसर्गाचे निदान करण्यासाठी केवळ रक्त तपासणीच सर्वात प्रभावी ठरू शकते.
राजस्थान हायकोर्टाने दिलेल्या निर्देशानुसार स्पष्ट झाले की, मानवी शरीरात कोरोना विषाणचा शोध घेण्यासाठी विविध चाचण्या घेतल्या जातात परंतु, फक्त रक्त तपासणीच सर्वात प्रभावी ठरू शकते.


















